पोलीस किंवा सुरक्षा दलाच्या पथकांना हिंसक कारवायांच्या सापळय़ात अडकवण्याची संधीच मिळत नसल्याने संतापलेल्या नक्षलवाद्यांनी आता वाहनांच्या जाळपोळीचे सत्र आरंभले आहे. यामुळे अनेक कंत्राटदारांनी कामे अर्धवट टाकून पलायन करणे सुरू केल्याने गडचिरोलीतील विकास कामे जवळजवळ ठप्प झाली आहेत. दुसरीकडे पोलिसांना त्यांची ठाणी उभारायलासुद्धा कंत्राटदार मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.
गेल्या ३० वर्षांपासून पूर्व विदर्भात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना गेल्या वर्षभरापासून शेजारच्या गडचिरोली जिल्हय़ात एकही मोठी हिंसक कारवाई करण्याची संधी मिळालेली नाही. उलट या काळात पोलीस व सुरक्षा दले कमालीची सक्रिय राहिली. गेल्या वर्षभरात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये ४० पेक्षा जास्त चकमकी घडून आल्या. यातील बहुतांश चकमकींमध्ये नक्षलवाद्यांना माघार घ्यावी लागली. या सर्व घडामोडींमुळे नक्षलवाद्यांच्या वर्तुळात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. त्याची जागा आता संतापाने घेतली आहे. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी गेल्या १० दिवसांपासून वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर सुरू केले आहेत. गेल्या रविवारी नक्षलवाद्यांनी धानोरा तालुक्यात गोडलवाही गावाजवळ तब्बल २७ वाहने जाळली. यात कंत्राटदाराचे सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या आधी नक्षलवाद्यांनी आलापल्ली ते भामरागड मार्गावर चार वाहने जाळली. अलीकडच्या काळात जाळण्यात आलेली सर्व वाहने विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची आहेत. नक्षलवाद्यांच्या या जाळपोळीचा धसका या जिल्हय़ात काम करणाऱ्या सर्वच कंत्राटदारांनी घेतला असून अनेकांना कामे थांबवून पलायन केले आहे. जाळपोळीच्या मोठय़ा घटना घडलेल्या दोन्ही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू होती. ही कामे आता कंत्राटदारांनी तातडीने बंद केली आहेत. याशिवाय दुर्गम भागात अनेक कामे आजवर सुरू होती. आता नक्षलवादी जाळपोळ करतील या भीतीने कंत्राटदारांनी कामावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवणे सुरू केले आहे. दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटदारांना सुरक्षा व्यवस्था देण्याची तयारी पोलीस व सुरक्षा दलांनी दाखवली असली तरी कंत्राटदार मात्र सुरक्षा घेऊन काम करण्यासाठी तयार नाहीत. सुरक्षा घेऊन काम केले तर नक्षलवादी आणखी त्रास देतील, अशी भीती कंत्राटदारांना सतावत आहे.  नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात काम करणारे कंत्राटदार प्रामुख्याने नक्षलवाद्यांशी आर्थिक देवाणघेवाण करून कामे पूर्ण करतात.
सध्या काम करणाऱ्या बहुतांश कंत्राटदारांनी असे व्यवहार केलेले आहेत. तरीही नक्षलवादी केवळ प्रशासनाला लक्ष्य करण्यासाठी या कंत्राटदारांची वाहने जाळत असल्याने या सर्वाची पंचाईत झाली आहे. नक्षलवाद्यांनी केलेली जाळपोळ लहान स्वरूपाची असली तर कंत्राटदार पोलिसांकडे तक्रार करण्याच्या भानगडीतसुद्धा पडत नसल्याचे अलीकडच्या काही घटनांवरून दिसून आले आहे.
दरम्यान नक्षलवाद्यांच्या विरोधात प्रभावी कामगिरी करणाऱ्या पोलीस व सुरक्षा दलांसमोर या जाळपोळीच्या प्रकरणांमुळे चिंता वाढली आहे. या सर्व घटनाक्रमांमुळे गडचिरोली जिल्हय़ातील बहुतांश कामे ठप्प झाली आहेत.
विकासकामे ठप्प
जिल्हय़ात पोलिसांना चार नवीन ठाणी उभारायची आहेत. यासाठी केंद्राने निधीसुद्धा दिला आहे. मात्र या बांधकामासाठी पोलिसांना कंत्राटदारच मिळत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाण्यांचे बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.