आगामी विधानसभा निवडणूक आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढविण्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्ष त्यागासाठी उतावीळ झालेल्या इच्छुकांच्या मनसुभ्यांना ब्रेक लागला आहे. आघाडीमुळे उमेदवारी मिळण्याची शाश्वती नसल्याने अनेक इच्छुकांनी महायुतीचे दरवाजे ठोठावले असले तरी त्यांचाही जागा वाटपाचा तिढा सुटेपर्यंत वेट अँण्ड वॉच या स्थितीत आमदारकीची दिवास्वप्ने पाहणारी मंडळी आहेत. उभय काँग्रेसमधून स्व-बळाची इच्छा प्रदर्शित होत असून पक्षातील गळती थोपविण्यासाठीच ही चाल खेळली जात असल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे मदानात उतरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या संजयकाका पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांना प्रचंड मताधिक्य मिळाले. यामुळे तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचे परिणाम दिसून येण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मातब्बर समजल्या जाणाऱ्या तीनही मंत्र्यांच्या मतदारसंघात महायुतीला भरभरून मतदान झाले. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या दृष्टीने महायुतीला झालेला मतदान आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
या तीनही मंत्र्यांच्या विरोधात असणारा सुप्त विरोध लोकसभा निवडणुकीत मतदारांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीनंतर वाळव्यातून जयंत पाटील थोडेसे निर्धास्त असले तरी डॉ. पतंगराव कदम व आर. आर. पाटील यांनी मतदारसंघाची बांधणी करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. गृहमंत्री पाटील तर लवाजमा बाजूला ठेवीत पुन्हा जनतेत मिसळण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे पुन्हा एकदा राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांसमोर येत आहे.
आघाडीतील मातब्बर अस्वस्थ असताना नकारात्मक मतांवर नजर ठेवून आतापर्यंत केवळ दुसऱ्या फळीत कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. शिराळ्यामध्ये मानसिंगराव नाईक यांना शिवाजीराव नाईक यांच्याशी कडवा संघर्ष करीत असतानाच आघाडीतील सत्यजीत देशमुख यांच्याशी दोन हात करावे लागण्याची चिन्हे आहेत. वाळव्यात जयंत पाटील यांना स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांच्या बरोबरच नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तर वनमंत्री डॉ. कदम यांना राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज देशमुख या पारंपरिक विरोधकाबरोबरच स्वाभिमानीच्या संदीप राजोबा या तरुण कार्यकर्त्यांशी संघर्षांला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.  खानापूर आटपाडीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अनिल बाबर यांच्यासोबतच राष्ट्रीय समाज पक्षाचे गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख अथवा राजेंद्र देशमुख यांच्याबरोबरच संघर्ष करावा लागणार आहे.
तासगांव-कवठेमहांकाळमध्ये माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी अघोषित प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यांना या ठिकाणी खा. संजयकाका पाटील यांची मिळणारी साथ आणि कवठेमहांकाळमधील त्यांचा विकास आघाडीचा गट मदतीला आहेच. जतमध्ये विलासराव जगताप यांना राष्ट्रवादीने बाहेर काढले असले तरी विधानसभा हे त्यांचे ध्येय लपून राहिलेले नाही. या ठिकाणी भाजपाचे प्रकाश शेंडगे हे विद्यमान आमदार असले तरी त्यांना या पूर्वी मिळालेली काँग्रेसची कुमक अडचणीत आणण्याची चिन्हे आहेत. सांगलीची जागा संभाजी पवार यांच्याकडे असली तरी ते आपले पुत्र पृथ्वीराज याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपाला फिलगुड असल्याने महायुतीत उमेदवारीसाठीच संघर्ष सुरू असला तरी काँग्रेसची उमेदवारी कोणाला, हाही प्रश्नच आहे. मदन पाटील पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असले तरी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची बीजे आमदारकीच्या उमेदवारीमध्ये रुजली असल्याचे मानले जात आहे. मिरजेत भाजपाच्या सुरेश खाडेंना अनुकूल स्थिती असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काय भूमिका घेतात यावरच उमेदवारीचे चित्र अवलंबून असणार आहे.