News Flash

पिरंगुट औद्योगिक वसाहत स्फोटातल्या मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सर्व सुरक्षा मानके आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यास मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासनाने सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. (संग्रहित छायाचित्र)

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहत इथल्या रासायनिक कंपनीतला स्फोट आणि आगीमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा, तसंच दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तात्काळ मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

उरवडेतल्या या रासायनिक कंपनीतल्या दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा. मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबतही प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर संबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आणखी वाचा- पिरंगुटमध्ये अग्नितांडव : १८ कामगारांचा मृत्यू

औद्योगिक वसाहतीतल्या रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगिक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा घेण्यात यावा तसंच सुरक्षा उपाययोजनांबाबत आणि नियमांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी आणि सुरक्षा उपाययोजनांतल्या त्रुटींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुळशी तालुक्यातील उरवडे- पिरंगुट औद्योगिक वसाहतीत एसव्हीएस अ‍ॅक्वा टेक्नॉलॉजी ही कंपनी आहे. या कंपनीत जंतुनाशकांची निर्मिती केली जाते. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. त्या वेळी कंपनीत ४१ कामगार होते. त्यापैकी १८ कामगार वातानुकूलन यंत्रणा असलेल्या विभागात पॅकिंगचे काम करत होते. त्यांच्या विभागाचे दार बंद असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.

आणखी वाचा- कर्त्यां महिलांचे हकनाक बळी; कुटुंबीय सुन्न

आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, रसायनांनी पेट घेतल्यामुळे आग आटोक्यात आणताना अडचणी येत होत्या. आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तासानंतर काही प्रमाणात आग आटोक्यात आली.

मात्र, कंपनीतील अंतर्गत भागात अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अडथळे येत होते. जेसीबी यंत्रे आणून काही भाग पाडण्यात आला आणि धुराला वाट करून देण्यात आली. जिवावर उदार होऊन जवानांनी अंतर्गत भागात प्रवेश करत रात्री नऊ वाजेपर्यंत अठरा मृतदेह बाहेर काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 5:22 pm

Web Title: uravade pirangut fire chief minister uddhav thackrey directed officials to give compensation vsk 98
Next Stories
1 जनतेनं साथ दिली, तर शरद पवार योग्य निर्णय घेतील -जयंत पाटील
2 “राहुल गांधींसमोर आता भाजपा प्रवेश हाच शेवटचा पर्याय!” निलेश राणेंचा खोचक सल्ला!
3 “…पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला”
Just Now!
X