जिल्ह्य़ातील व्यापा-यांच्या अर्थकारणात प्रमुख भूमिका बजावणा-या व शतकोत्तर वाटचाल करणा-या नगर अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाल्याने संचालकपदासाठी इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी व त्यांचे विरोधक असे दोनच प्रमुख पॅनेल निर्माण होण्याची शक्यता आहे. या पॅनेलची निर्मितीही अंतिम टप्प्यात आहे.
बँकेच्या मागच्या निवडणुकीपासून गांधी यांच्याबरोबर असणारे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा वयोमानामुळे यंदा निवडणूक लढवणार का, याबद्दल सभासदांमध्ये सध्या संभ्रम आहे. मल्टिस्टेटमुळे बँकेच्या संचालकांची संख्या कमी झाली आहे, परंतु दोन्ही प्रमुख पॅनेलकडे विद्यमान संचालकांची संख्या मोठी असल्याने नव्या चेह-यांना किती संधी मिळणार हाच प्रमुख प्रश्न आहे.
सन २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत २५ संचालकांमध्ये खा. गांधी-गुंदेचा यांनी बहुमत मिळवत तब्बल २३ पटकावल्या होत्या. परंतु नंतर बँकेच्या कारभारावरून अनेक संचालक गांधी यांच्यापासून दूर झाले व गांधी नंतर अल्पमतात आले होते. गांधी विरोधक आमच्याकडे १३ व गांधी यांच्याकडे १२ संचालक असल्याचा दावा करतात. गांधी विरोधी पॅनेलची सूत्रे माजी अध्यक्ष अशोक कोठारी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र ते स्वत: निवडणूक लढवतात की पडद्याआडून सूत्रे हलवणार हे स्पष्ट झालेले नाही.
अभय आगरकर गांधी विरोधी पॅनेलकडून निवडून आले होते, परंतु भाजपच्या पक्षीय राजकारणात ते भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून गांधींबरोबर आहेत, त्यामुळे ते विरोधी पॅनेलमध्ये राहतात की गांधीकडे जातात याबाबत उत्सुकता आहे. गांधींबरोबर असणा-या राजेंद्र गांधी, दीप चव्हाण व डॉ. पारस कोठारी या तिघा संचालकांनी सुरुवातीला कारभारातून विरोधी भूमिका घेतली. नंतर संजय छल्लारे, राजेंद्र पिपाडा, अमृत गट्टाणी, सुरेश बाफना, दीपक दुग्गड, लता लोढा, जवाहर मुथा, नवनीत बोरा असे संचालक विरोधी गटाला मिळाले.
खर्चावर बंधन नाही
निवडणुकीसाठी आचारसंहिता असली तरी उमेदवारांच्या खर्चावर निर्बंध नाहीत. त्यामुळे प्रचारातील उधळपट्टीवर नियंत्रण राहणार नाही. मात्र उदघाटने, कार्यक्रम, दौरे यावर बंधने आहेत. ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही.
सात जागा कमी झाल्या
पूर्वी बँकेचे संचालक संख्या २५ होती, ती आता कमी होऊन १८ वर आली आहे. नगर मनपा व भिंगार छावणी मंडळाच्या हद्दीतील मतदारसंघात १२ उमेदवार निवडून द्यायचे आहेत, त्यापैकी १ महिला व १ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून ५ जागा आहेत, त्यातील १ महिलासाठी राखीव आहे. राज्याबाहेरील कार्यक्षेत्र मतदारसंघात १ जागा आहे. पूर्वी महिलांच्या ३ जागा होत्या, त्या आता दोन राहिल्या आहेत. शाखांसाठी पूर्वी ६ होत्या त्या आता ४ राहिल्या आहेत, दुर्बल घटक, एनटी, ओबीसीच्या जागा रद्द झाल्या आहेत.
मतदार-उमेदवार विसंगती
बँकेचे एक लाखाहून अधिक सभासद असले तरी ८ ऑक्टोबर २०१४ पूर्वी एक हजार रुपयांचे शेअर्स घेतलेल्या ४८ हजार ३६३ जणांनाच मतदानाचा हक्क आहे. सुमारे ६६ हजार सभासदांना यंदा मतदान करता येणार नाही. महाराष्ट्र वगळता बाहेर केवळ गुजरातमध्येच मतदार आहेत. त्यांची संख्या ४०० (सुरत २८९ व अहमदाबाद १११) आहे. तेथे शाखाही अद्याप सुरू झालेली नाही, परंतु हे मतदार एक संचालक निवडून देणार आहेत. नगर व भिंगारमध्ये एकूण सुमारे १४ हजार मतदार आहेत हे संचालक १२ संचालक निवडून देतील तर उर्वरित जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रातील ३३ हजार मतदार ५ संचालक निवडून देणार आहेत.