मराठी माध्यामांच्या शाळांमध्ये उर्दू शिक्षक नियुक्त करण्याच्या महसूल व वक्फ खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांच्या विधानाचा निषेध मंगळवारी शिवसनिकांनी नोंदविला. शिवाय शिवाजी चौकात शिवसनिकांनी खडसेंविरोधात घोषणाबाजी करीत जोरदार निदर्शने केली.
खडसे यांनी राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये उर्दू शिकण्याची तयारी एखाद्या विद्यार्थ्यांने दर्शविली, तर तेथे उर्दू शिक्षक नियुक्त करण्यात येतील असे विधान केले होते. भाजपाविरोधात पंगा घेतलेल्या शिवसनिकांनी या विधानावरून खडसे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी खडसे यांच्या विधानाचा समाचार घेतला होता. तर शिवसेनेची खडसे विरोधाचे लोण आता जिल्हा पातळीवरही पोहोचले आहे. यातूनच येथील शिवसनिकांनी शिवाजी चौकात जमून खडसे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने केली. हातात हिरव्या टोप्या घेऊन तसेच मानवी मुखवटय़ास हिरवी टोपी घालून आलेल्या शिवसनिकांनी खडसे यांचा निषेध नोंदविला.
या वेळी युवा सेनेचे अध्यक्ष हर्षल सुर्वे म्हणाले, मुस्लीम वा कोणत्याही शैक्षणिक संघटनांची मागणी नसताना मराठी माध्यमांध्ये उर्दू शिक्षक नेमण्याचा फतवा मंत्री खडसे यांनी काढला आहे. अशाप्रकारचे बालिश विधान करण्यापूर्वी खडसे यांनी आपण शिक्षणमंत्री नाही याचे तरी भान ठेवावयास हवे होते, अशी टीका केली. मतांसाठी व सत्तेसाठी केलेले विधान खडसे यांनी मागे घ्यावे अशी मागणीही या वेळी करण्यात आली.