सोलापुरात येत्या शुक्रवारपासून सोमवारपर्यंत (दि.२५ ते २८) या चार दिवसांच्या कालावधीत आयोजिलेल्या अखिल भारतीय उर्दू नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रसिध्द उर्दू नाटककार रामगोपाल बजाज (नवी दिल्ली) हे संमेलनाध्यक्ष आहेत. यानिमित्ताने देशभरातून सुमारे तीनशे उर्दू रंगभूमीवरील कलावंतांची मांदियाळी सोलापुरात पाहावयास मिळणार आहे.
हुतात्मा स्मृतिमंदिरात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ उर्दू नाटककार प्रा. बेग अहेसास (हैद्राबाद) हे आहेत. तर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनात चर्चासत्रासह १६ उर्दू नाटकांचे सादरीकरण होणार आहे. संमेलनाचे प्रमुख संयोजक तथा माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी संमेलनातील आयोजित कार्यक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी (दि. २५) दुपारी तीन वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी आमदार दिलीप माने, महापौर प्रा. सुशीला आबुटे आदी उपस्थित राहणार आहेत.
रविवार, (दि.२७) भवानी शंकर यासीर ( श्रीनगर) यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे. ‘उर्दू रंगभूमीचे बदलते स्वरूप’ असा चर्चासत्राचा विषय आहे. यात एस. एम. अजहर आलम व उमा झुनझूनवाला (कोलकाता), मुश्ताक काक (जम्मू काश्मीर), विनय वर्मा (मुंबई) या अधिकारी व्यक्तींचा सहभाग राहणार आहे. तर दि. २८ रोजी ‘पेशकश’ या स्मरणिकेचे प्रकाशन ‘इफ्टा’चे कुलदीप सिंग (मुंबई) यांच्या हस्ते व इफ्टाचेच रमेश तलवार (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या वेळी कर्नाटक उर्दू अकादमीच्या अध्यक्षा डॉ. फौजिया चौधरी यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पालिका आयुक्त विजय काळम-पाटील, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार आदी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार असल्याचे अॅड.बेरिया यांनी सांगितले.
या संमेलनात प्रारंभी शुक्रवारी (दि.२५)सायंकाळी ६.३० वाजता मुंबईच्या आयडियल नाट्य अकादमीमार्फत ‘आझाद का ख्वाब हिंदुस्थान की आझादी’ हे देशभक्तिपर नाटक सादर केले जाणार आहे. याशिवाय जम्मू, श्रीनगर, उदयपूर, हैद्राबाद, लखनौ, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली येथील नामवंत उर्दू रंगभूमीवरील नाट्यप्रयोग सादर केले जाणार असून यात कैफी आझमीलिखित व एम. एस. सेतू दिग्दíशत, इफ्टाप्रस्तुत ‘आखरी शमा’ हे नाटकाचे आकर्षण राहणार असल्याचे बेरिया यांनी सांगितले.