03 April 2020

News Flash

उर्दू शायरीचे कोंदण बशर नवाज यांचे निधन

शायरीवर भाषण करण्याऐवजी असा शेर ऐकवावा की थेट हृदयापर्यंत भावना पोहोचतील, असे स्वत:च्या शायरीचे वर्णन करणारे व ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ अशी

| July 10, 2015 01:20 am

शायरीवर भाषण करण्याऐवजी असा शेर ऐकवावा की थेट हृदयापर्यंत भावना पोहोचतील, असे स्वत:च्या शायरीचे वर्णन करणारे व ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ अशी गजलसाद घालून आपल्या शायरीची भुरळ उर्दू जगताला, म्हणजे भारत-पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांतील चाहत्यांना घालणारे बशर नवाज खान यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. रचना व बाजाच्या नव्या शायरीत मानवी जगणे सहज चिमटीत पकडणारा अशी ओळख असणारे कवी म्हणून त्यांची उर्दू जगतात ओळख होती.
‘रहेगा’, ‘अजनबी’ व सम्बंध हे तीन काव्यसंग्रह उर्दू भाषकांसाठी जणू अत्तराची कुपीच. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल महाराष्ट्र उर्दू अकादमी, फक्र ए महाराष्ट्र तसेच गालिब अकादमीच्या वतीने त्यांना सन्मानित केले होते. केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या बशर नवाज यांच्या लेखनातून त्यांचा जीवनानुभव डोकवायचा, म्हणूनच त्यांची शायरी लोकप्रिय होती. केवळ शायरीच नाही, तर अगदी गल्लीच्या कोपऱ्यावरील रिक्षावाल्यापासून ते लहान मुलांपर्यंत ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटत.
१९५४मध्ये पहिली गजल लिहिणारे बशर नवाज ‘बाजार’ चित्रपटातील ‘करोगे याद’पासून प्रकाशझोतात आले. लोरी, बाजार, जानेवफा यासह अनेक चित्रपटांत त्यांची गजल गायिली गेली. ‘करोगे याद’ या नावाने त्यांच्या गजलांचे मराठीत लिप्यांतरण झाले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या मराठी चाहत्यांसाठी ही प्रत ते आवर्जून देत. शायरी, समीक्षा व टीका या साहित्य प्रांतात त्यांचे मोठे नाव होते.
त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहताना ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजली म्हणाले, की मानवी जगण्यातील सुख-दु:ख सहजपणे मांडणारा शायर गेला. मकदूम, कैफी आजमी यांच्या तोडीची त्यांची शायरी होती. विषय, लहेजा व घाट या तिन्ही अंगाने बशर नेहमीच लक्षात राहतील.
दख्खनीतील कुली कुतुब, सिकंदरअली वज्द, अख्तर नासीर, कमल इक्बाल या शायरांच्या बरोबरीने बशर नवाज यांनी काम केले. कमल इक्बाल, काजी सलीम व बशर नवाज असे उर्दू शायरीतील त्रिकुट काव्यमांडणीच्या अंगाने सर्जनशील ठरले. १९६०नंतरच्या कालखंडात बशर नवाज यांचे नाव एका उंचीवर गेले आणि त्यांनी ती उंची कायमस्वरूपी राखल्याची प्रतिक्रिया गुरुवारी दिवसभर मान्यवरांच्या तोंडी होती.
चित्रपटातील बडय़ा नामवंत कलाकारांशी त्यांची घनिष्ठ मत्री होती. नसीरुद्दीन शाह, फारूख शेख, दिलीपकुमार, धर्मेद्र, रझा मुराद यांसह अनेक मोठय़ा कलाकारांशी अनेकदा संपर्क आलेले बशर नवाज औरंगाबादकरांना मात्र अगदी सहज उपलब्ध होते. १९५८ ते १९७३ या कालावधीत त्यांनी महापालिकेतही नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. मराठी व उर्दू काव्यक्षेत्रात अनुबंध असणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. निधनाचे वृत्त समजताच वेगवेगळय़ा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या भडकलगेटजवळील घराकडे धाव घेतली. तेव्हा त्यांच्या घरातील अस्फुट हुंदके ऐकताना त्यांच्या ‘करोगे याद’मधील शेवटचे कडवे अनेकांच्या मनात रुंजी घालत होते.
गली के मोड पे सुना- कोई दरवाजा
तरसती आँखों से रस्ता किसीका देखगा
निगाह दूर तलक जाके लौट आयेगी..
करोगे याद तो हर बात याद आयेगी..
उर्दू शायरीत त्यांची अशी आठवण नेहमी राहील, अशी प्रतिक्रिया रहबर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तिलावतअली, उर्दू साहित्याचे जाणकार डॉ. ए. जे. खान, मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 1:20 am

Web Title: urdu poet bashar nawaz died
टॅग Aurangabad,Died
Next Stories
1 मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार
2 विद्यार्थ्यांच्या हाणामारीत सातवीतील मुलाचा मृत्यू
3 प्रतिभावंत उर्दू शायर बशर नवाज कालवश
Just Now!
X