राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा सध्या रंगली आहे. उर्मिला मातोंडकरला शिवसेनेकडून विधानपरिषेदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, काँग्रेसनं विधान परिषदेवर जाणार का? अशी विचारणा केली असता उर्मिलानं स्पष्टपणे नकार दिला आहे.

T V9 मराठीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेसाठी विचारणा केली. पण त्यांनी राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगत नकार दिला. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे.’

आणखी वाचा- पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

उर्मिला मातोंडकर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आमच्या उमेदवार होत्या. त्या मराठी असून त्यांनी कंगना रनौतच्या विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांना विधानपरिषदेवर पाठवावं असं शिवसेनेला वाटणं स्वाभाविक आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

आणखी वाचा- विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या ऑफरला उर्मिला मातोंडकर यांचा होकार

राऊत काय म्हणाले ?
संजय राऊत यांना उर्मिला मातोंडकरला पक्षाकडून उमेदवारी देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “यासंदर्भात मीदेखील चर्चा ऐकत आहे. हा निर्णय मंत्रीमंडळाचा असतो. मंत्रीमंडळात निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात मंत्रीमंडळाने अधिकार दिले आहेत”.