अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करत विजय संपादित केला. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. भारतातही या निवडणुकीच्या चर्चा सुरू असून, अध्यक्षीय निवडणूक व विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर भाष्य करताना शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना चिमटा काढला आहे. “ट्रम्प यांना ऐन ‘करोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच करोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही,” असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.

अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या वर्तणुकीवर टीका करतानाच शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला आहे. “अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. प्रे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजपा पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते. ट्रम्प यांना ऐन ‘करोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच करोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“ट्रम्प यांनी पराभव स्वीकारायला नकार दिला आहे. मतमोजणी व मतदानात घोटाळे झाले आहेत, असा हास्यास्पद आरोप त्यांनी केला. अनेक मोठ्या राज्यांनी ट्रम्प यांना नाकारले. ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्राची अप्रतिष्ठा होत असल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नाही. प्रे. ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे. लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल. जगातल्या प्रमुख लोकशाही राष्ट्रांत हिंदुस्थानबरोबर अमेरिकेचाही संदर्भ येतो, पण लोकशाहीचा लेप लावून काही लोक नौटंकी करीत असतात व ‘लोकशाहीचे बाप आपणच आहोत’, असा आव आणत असतात,” अशा शब्दात शिवसेनेनं प्रत्यक्षरीत्या भाजपावर निशाणा साधला आहे.

कमलाबाई उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग

“अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. कमला हॅरिस यांची व्यक्तिगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखविले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळ्यात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण या कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरून अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच हॅरिस बाईंच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत असतील तर हा ‘ट्रम्प’छाप विनोद म्हणावा लागेल. ते काही असो, हिंदुस्थानने ‘नमस्ते ट्रम्प’ केले असले तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना ‘बाय बाय’ करून चूक सुधारली,” असं म्हणत शिवसेनेनं पंतप्रधान मोदी व भाजपाला लक्ष्य केलं.