शिर्डी लोकसभा मतदारसंघात बौद्ध समाजावर सर्वच राजकीय पक्षांनी अन्याय केल्याची भावना गुरुवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. येथे सर्वाचा मिळून एक उमेदवार उभा करायचा की मतदानातील नकाराधिकार वापरायचा याबाबतचा निर्णय उद्या (शुक्रवार) घेऊ अशी माहिती भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सचिव तथा या निवडणुकीतील एक प्रमुख दावेदार अशोक गायकवाड यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले, की शिर्डी लोकसभा मतदारसंघात दलित, बौद्ध व ख्रिश्चन या समाजांचे सुमारे तीन ते साडेतीन लाख मतदान आहे. गेल्या वेळी हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला, मात्र त्या व याही निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाने येथील उमेदवारीसाठी या समाजांचा विचार केलेला नाही. भारिपची शिवसेना-भाजपशी युती असून त्यांच्या युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेला आहे. या मतदारसंघातून आपण स्वत: शिवसेनेकडून इच्छुक होतो किंवा हा मतदारसंघ त्यांनी भारिपला सोडावा अशीही मागणी आम्ही केली होती. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मतदारसंघाचे पूर्ण गणितही समजावून सांगितले होते. त्या वेळी त्यांनी गांभीर्याने उमेदवारीचा विचार करू असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्याचा विचार झाला नाही.
या मतदारसंघात आपण स्थानिक आहोत, मात्र शिवसेनेने आपल्याला डावलून बाहेरील उमेदवाराला येथे संधी दिली. शिवाय दलित, बौद्ध व ख्रिश्चन समाजाला डावलले असे सांगून गायकवाड म्हणाले, याबाबत शिर्डी मतदारसंघातच नव्हेतर जिल्हय़ात व अन्यत्रही संतापाची भावना आहे. वास्तविक येथून दलित समाजाला उमेदवारी देऊन राज्यात वेगळा संदेश या मंडळींना देता आला असता, मात्र त्याचा विचार होऊ शकला नाही.
याच संदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी उद्या (शुक्रवार) नेवासे येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. माझ्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कोणा एकाची उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढवायची की त्याऐवजी मतदानातील नकाराधिकार (नोटा) वापरून समाजाची ताकद दाखवून द्यायची याबाबतचा निर्णय उद्या घेणार आहोत. याबाबत पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही सर्व गोष्टींची कल्पना देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.