|| प्रल्हाद बोरसे

गुन्हेगारी वाढण्यास  कारणीभूत

मालेगाव : ‘अल्प्राझोलम’ या उत्तेजकाचा नशेसाठी अवैधपणे होणारा वाढता वापर मालेगावात डोकेदुखी निर्माण करणारा ठरत आहे. ‘कुत्ता गोळी’ या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उत्तेजकाचे अनेक लोक शिकार होत आहेत. ही बाब शहरातील गुन्हेगारी वाढण्यासही कारणीभूत ठरत आहे.

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

अ‍ॅलोपॅथीमध्ये मानसिक विकार, निद्रानाश यासारख्या कारणांसाठी प्रामुख्याने ‘अल्प्राझोलम’ हे औषध दिले जाते. गोळ्यांच्या स्वरूपातील या औषधाचे दरही तुलनेने कमी असून ०.२५ आणि ०.५० मिली ग्रॅम मात्रेच्या एका गोळीचा निर्धारित दर अनुक्रमे पावणेदोन आणि पावणेचार रुपयांच्या आसपास असतो. वास्तविक ‘शेड्युल एक’ या वर्गवारीत मोडत असलेले हे औषध अधिकृत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिले जाऊ  शकत नाही, परंतु अनेकदा या नियमाकडे डोळेझाक होते. औषध दुकानदार बेकायदा आणि चढ्या दरात ते व्यसनाधीनांना देतात. कोणतीही खातरजमा न करता उपलब्ध होणाऱ्या या औषधाचा नशा करण्यासाठी सर्रास वापर होत असतो. हे औषध अन्य मादक पदार्थांच्या तुलनेत स्वस्तात नशा मिळवून देणारे साधन समजून निर्धारित दरापेक्षा तीन ते चारपट जादा किंमत मोजण्याचीही व्यसनाधीनांची तयारी असते. याशिवाय काही जण विशिष्ट ठिकाणी बस्तान बसवत अवैध पद्धतीने काळ्याबाजारात या औषधांची विक्री करत असून त्यात काही टोळ्या सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वितरक, दुकानदार, तस्कर, वाहतूकदार असे घटक या साखळीत असल्याचे सांगण्यात येते.

शहरात या औषधाच्या गैरवापराविरोधात दहा वर्षांपासून तक्रारी करण्यात येत आहेत. परंतु अलीकडे चार-पाच वर्षांपासून या औषध विक्रीतील उलाढाल लक्षणीयरीत्या वाढल्याने या विषयातील गांभीर्य अधोरेखित झाले. पोलीस आणि अन्न-औषध प्रशासनाने या प्रकरणी काही जणांवर यापूर्वी वेळोवेळी फौजदारी कारवाई केली आहे. तरीदेखील पोलिसांची नजर चुकवत शहरात हा गोरखधंदा सुरूच असल्याचे सांगितले जाते. स्वस्तात मिळणाऱ्या या औषधाची मागणी वाढल्यावर त्याची चढ्या भावात अवैध विक्री करणाऱ्या काही परप्रांतीय टोळ्या कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी मालेगाव पोलिसांनी गुजरातमधील एका व्यापाऱ्याला तसेच त्याच्या मालेगावमधील हस्तकांना याच संशयावरून अटक केली होती. त्यावेळी हे तस्कर परराज्यातून शहरात मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला दुप्पट भाडे मोजत असल्याचे उघड झाले होते.

या औषधाच्या अमलाखालील तरुणांकडून शहरातील नावाजलेल्या भारत व्यायामशाळेचे अध्यक्ष मंगेश बिरारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न नुकताच झाला आहे. बिरारी हे संगमेश्वर भागात एका दुकानाबाहेर खुर्चीवर बसले असताना तेथे काही तरुण आले. त्यातील एकाने कुरापत काढून नाहक वाद घातला. बिरारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केल्यावर तरुणांनी कुठलाही विचार न करता त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. प्रसंगावधानामुळे ते बचावले. नशेत बेधुंद असल्यामुळेच या तरुणांकडून हा प्रमाद घडल्याचे तसेच शहरात यासारखे हल्ले होण्याच्या घटना वरचेवर घडत असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय महिलांचा विनयभंग, रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे भ्रमणध्वनी हिसकावून पलायन करणे, महिलांचे दागिने हिसकावणे, दुचाकी चोरी अशी गुन्हेगारी कृत्ये हे नशेखोर करीत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

विद्यार्थीही आहारी

’शहरातील वेगवेगळे घटक या उत्तेजकाच्या आहारी गेल्याचे आढळते. विशेषत: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा त्यात अधिक भरणा असल्याची माहिती आहे. प्रमाणापेक्षा जास्त मात्रा घेतल्यास या औषधाचे अनेक दुष्परिणाम संभवतात. या औषधाच्या सेवनामुळे मेंदूवरील नियंत्रण सुटते.

’बेधुंद झालेली व्यक्ती एखादे गैरकृत्य करण्यास उद्युक्त होण्याचा धोका असतो. त्यामुळे या औषधाच्या वाढत्या खपाचा संबंध गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या वर जाणाऱ्या आलेखाशी जोडला जात आहे.

या उत्तेजकाचे सेवन करून नशा करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मालेगावकरांचा त्रास वाढत आहे. तसेच यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असून भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. या औषधाच्या अवैध विक्रीला पायबंद घालावा म्हणून यापूर्वी अनेकदा पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. मादक पदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरात एक पूर्णवेळ निरीक्षक नियुक्त करावा, ही साधी मागणीदेखील दुर्लक्षित ठेवण्यात आली आहे.   – रामदास बोरसे, अध्यक्ष,  नागरी समिती, मालेगाव