30 March 2020

News Flash

चंद्रपूरमधील तरुणाई ‘ब्राऊन शुगर’च्या आहारी

दारूबंदीनंतर चंद्रपूरमध्ये आता ब्राऊन शुगर, गांजा अशा अंमली पदार्थाचा व्यवसाय तेजीत असल्याचे समोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र जुनारकर

दारूबंदीनंतर चंद्रपूरमध्ये आता ब्राऊन शुगर, गांजा अशा अंमली पदार्थाचा व्यवसाय तेजीत असल्याचे समोर आले आहे. ब्राऊन शुगरचे व्यसन करणाऱ्या तरुणांना गाठले असता या रॅकेटविषयीची धक्कादायक बाब समोर आली. अवघ्या १५० ते ३०० रुपयांपर्यंत ब्राऊन शुगरची पुडी मिळते, असे एका तरुणाने सांगितले. ब्राऊन शुगरच्या दर्जानुसार हा दर ठरवला जातो.

बाबूपेठेतील छोटू, सोनू आणि दादमहल परिसरातील आवेश या तिघांकडे सर्वात जास्त ब्राऊन शुगर उपलब्ध असल्याचे या तरुणांनी सांगितले. (या तिघांची ही टोपणनावे आहेत. पूर्ण नाव माहीत नसल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे.) या व्यवसायात एक महिला देखील सक्रिय असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. चांगल्या दर्जाचे ब्राऊन शुगर ३०० रुपयांपर्यंत मिळते. हे ब्राऊन शुगर नागपूरमधून तर गांजा प्रामुख्याने अमरावतीतून येतो असे या तरुणांनी सांगितले. सध्या निवडणूक काळात पोलिसांची कारवाई वाढली आहे. वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. त्यामुळे शहरात मोजक्याच लोकांना हे अंमली पदार्थ उपलब्ध होत आहे. जे तरुण आधी व्यसन करायचे, तेच आता विक्री देखील करू लागले आहेत. ‘पहले से ही बेरोजगार है, कम से कम इधरसे तो पैसे कमा लेंगे,’ असे एका तरुणाने सांगितले. ये पावडर की लत बुरी है, असे देखील त्याने मान्य केले. दारूबंदीनंतर शहरात दारूची अवैध मार्गाने विक्री केली जाते. भेसळ केलेले मद्य महागडय़ा दरात घेण्याऐवजी तरुण या व्यवनाकडे वळू लागल्याचे सांगितले जात आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य

शहरातील महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांना लक्ष्य केले जाते. सुरुवातीला १०० रुपयात विक्री होते. हळूहळू दर वाढवले जातात. एकदा तरुण आहारी गेला की तो कोणत्याही परिस्थितीत ‘पुडी’ साठी पैशांची सोय करतो. एका तरुणाने या व्यसनापायी महागडी दुचाकी १० हजार रुपयांमध्ये गहाण ठेवली होती, असा अनुभव एका स्थानिकाने सांगितला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2019 1:35 am

Web Title: use of brown sugar for youth in chandrapur
Next Stories
1 कोल्हापुरात पोलीस पथकावर हल्ला, माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जण अटकेत
2 पार्थ पवार – श्रीरंग बारणे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने केलं कौतुकास्पद काम
3 नेते प्रचारात दंग, नागरिकांवर जलसंकट
Just Now!
X