लोहारा येथील श्री उज्ज्वल गौरक्षण संस्थेत ४५० गायी आहेत. या गायींच्या शेणापासून शेणखताबरोबरच आता गोवऱ्या तयार केल्या जातात आणि या गोवऱ्यांचा वापर अंत्यसंस्कारासाठी केला जात आहे.

जिल्ह््यात कत्तलखान्यात नेण्यासाठी गायीची तस्करी ही नित्याची बाब आहे. या गायींना कत्तलखान्यापासून वाचवून त्यांचे गौशाळेत पालन-पोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र गौशाळेत गायींची संख्या अधिक झाल्याने त्यांच्या पालन-पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. अशातच, गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्या अंत्यसंस्कारासाठी देऊन त्यापासून येणाऱ्या पैशांतून गौशाळेतील गायींचे पालन-पोषण करण्याचा स्तुत्य उपक्रम श्री उज्ज्वल गौरक्षण संस्थेने सुरू केला. या उपक्रमामुळे लाकूडतोड थांबेल. शिवाय गोवऱ्यांमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईल. चंद्रपूर शहरालगत असलेल्या लोहारा गावामध्ये दोन एकर परिसरात श्री उज्ज्वल गौरक्षण संस्थेची गौशाळा आहे. या गौशाळेमध्ये कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या गायी वाचवून त्यांचे पालन-पोषण व संवर्धन केले जाते. जैन साध्वी प्रीती सुधाजी यांच्या पुढाकारातून ही गौशाळा १९९४ मध्ये स्थापन करण्यात आली. अध्यक्ष सुरेंद्र दवे यांच्या नेतृत्वात या गौशाळेचे काम चालते. या गौशाळेची क्षमता ७०० ते ८००ची आहे. सद्य:स्थितीत गौशाळेत ४५० गाई आहेत. गायीला राहण्यासाठी पाच शेड असून चाऱ्यासाठी दोन शेड आहेत. पहाटे ५ वाजता गौशाळेचा दिनक्रम सुरू होतो. सर्व गायींना एकत्र करून सोडण्यात येते. त्यानंतर शेण गोळा करण्यात येते. दुपारी १२ वाजताच्या सायंकाळी ५च्या नंतर गायींना शेडमध्ये बंद केले जाते. विशेष म्हणजे, गौशाळेत आजारी गायी असल्यास त्यांची काळजी घेऊन पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत औषधोपचार केला जातो. कधी-कधी साथीचे रोग येतात. त्यामुळे गायींवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा खर्च भरून न निघणारा आहे हे माहीत असताना गायीला गोमाता मानून औषधोपचार केला जातो. गौशाळेला दाते व सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात दान देत असतात. या गौशाळेत गायीच्या शेणापासून खत तयार केले जात होते. हे बघून संस्थेचे सदस्य जुगलकिशोर सोमानी यांनी शेणापासून गोवऱ्या तयार करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वांनी मंजुरी देत  शेणापासून गोवऱ्या तयार करण्यास सुरुवात झाली. सकाळी सर्वप्रथम गौशाळेतील गायींचे शेण गोळा करून एका ठिकाणी एकत्र केले जाते. त्यानंतर शेणाच्या गोवऱ्या तयार केल्या जातात. त्या गोवऱ्यांना चार ते पाच दिवस कडक उन्हात वाळवण्यात येते. नंतर सर्व गोवऱ्या एका शेडमध्ये पद्धतशीरपणे ठेवल्या जातात. अंत्यसंस्कारावेळी गोवऱ्यांची मागणी झाल्यानंतर एका ट्रॅक्टरमध्ये भरून त्या पुरवल्या जातात. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होत आहे.  गोवऱ्यामध्ये विशेष आयुर्वेदिक घटक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोवऱ्याच्या जाळण्यामुळे वातावरणातील हवा स्वच्छ राखण्यास मदत होते, असेही सांगितले जाते.

जप्त जनावरांची गौशाळेत देखभाल

तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी केली जाते. आंतरराज्यीय महामार्गावर पोलिसांनी कारवाई करून अनेक जनावरांची सुटका केली आहे. कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांमध्ये भाकड जनावरेसुद्धा असतात. भाकड जनावरांचे गौशाळेत पालन-पोषण केले जात आहे.

शेतकऱ्यांप्रति सहानुभूती

सर्पदंश, वीज पडून तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या शेतकऱ्याचा बैल मरण पावल्यास त्या शेतकऱ्याला शेतीच्या हंगामात दुसरा बैल घेणे परवडत नाही. त्यामुळे गौशाळा व्यवस्थापनाकडून अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्याप्रति सहानभूती बाळगत त्याला बैल नि:शुल्क भेट दिला जातो.

अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांचा उपयोग केल्यास गौशाळेची आर्थिक स्थिती मजबूत होईल. गोवऱ्यांच्या वापरामुळे झाडांची कत्तल कमी होऊन पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल. संस्थेकडे अंत्यसंस्कारासाठी गोवऱ्यांची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यास उत्पादन वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

– दीपक डगली, संचालक, श्री उज्ज्वल गौरक्षण संस्था, चंद्रपूर.