वसई-विरारमध्ये पालिकेची कारवाई थंडावल्याने वापरात वाढ

वसई : करोनाकाळात पालिकेची यंत्रणा उपचार आणि रुग्णसेवेत गुंतली असताना शहरात प्लास्टिकचा वापर वाढल्याचे चित्र आहे. पालिकेची प्लास्टिकविरोधातील कारवाई थंडावली आहे. त्याचा गैरफायदा शहरातील छोटे दुकानदार आणि भाजी विक्रेते घेत आहेत.

दोन वर्षांपूर्वी राज्यात प्लास्टिक पिशव्यांची निर्मिती आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावर कारवाईचे अधिकार पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आले आहेत. त्यानुसार सुरुवातीला कंपन्यांसह दुकाने आणि पदपथ विक्रेत्यांवर छापे टाकून मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले होते.

करोनाकाळात ही कारवाई पूर्णपणे थंडावल्याने प्लास्टिकच्या वापरात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे.

सर्व दुकाने बंद होती त्यामुळे प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण कमी झाले होते; परंतु जून महिन्यापासून टाळेबंदीत शिथिलता मिळताच दुकाने, बाजारपेठा, भाजी मार्केट हळूहळू सुरू झाली. त्यामुळे प्लास्टिकच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुकानदार व फेरीवाले सामान देताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे चित्र दिसून आले.

प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने वसई-विरारमधून दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्यामध्येदेखील त्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई पालिकेने हाती घ्यावी, नाही तर वसई-विरार शहर प्लास्टिकमय होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

छुप्या मार्गाने शहरात?

वसई-विरार महापालिकेने प्लास्टिकची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना टाळे ठोकले होते. त्यासोबतच प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली होती. तरीसुद्धा काही केल्या प्लास्टिकचा वापर कमी झाला नाही. शहरात प्लास्टिकबंदी असतानाही शहरात छुप्या मार्गाने प्लास्टिक येऊ लागले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या पिशव्या शहरात आणून बेकायदा मार्गाने विकल्या जात आहेत. या छोटे दुकानदार, किरकोळ विक्रे ते, फेरीवाले व इतर माल विक्रे ते यांना पुरविल्या जात आहेत. याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने बंदी असूनही प्लास्टिकचा वापर होत आहे.