प्रबोध देशपांडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा पुढाकार

पश्चिम विदर्भात असलेल्या खारपाणपट्टय़ातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ज्वारी पेरणीचा प्रयोग करण्यात येत आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने पुढाकार घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात खारपाणपट्टय़ातील ५०० एकरवर ज्वारी पेरण्यात आली असून, त्यातून भरघोस उत्पादन झाले आहे.

अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यंमध्ये खारपाणपट्टय़ामुळे कृषी क्षेत्र बाधित झाले. पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर सुमारे १५ कि.मी. रुंदीचा खारपाणपट्टा पसरलेला आहे. विदर्भाची पूर्व-पश्चिम वाहिनी असलेल्या पूर्णा नदीने सात हजार ५०० चौ.कि.मी.चे क्षेत्र व्यापले आहे. त्यापैकी ४७०० चौ.कि.मी. म्हणजे ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त क्षेत्र खारपाणपट्टय़ात मोडते. खारपाणपट्टय़ात मातीसोबतच पाणी सुद्धा खारे असल्याने भू-गर्भातील पाणी, सिंचन तसेच पिण्यासाठी अयोग्य आहे. पर्यायाने भू-पृष्ठावरील साठय़ाशिवाय दुसरा पर्याय नाही. या जमिनीत मातीच्या कणांवर चिकटलेल्या क्षाराचे (सोडियम) सरासरी शेकडा प्रमाण ३.९७ ते १५.३५ दरम्यान आहे. सिंचनाच्या सोयी नसल्याने खारपाणपट्टय़ातील ९० टक्के शेतकरी दुबार पीक देखील घेत नाहीत. त्यातच परंपरागत पिकांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादित राहते.

खारपणपट्टय़ातील रब्बी हंगामाच्या परिस्थितीत बदल करण्याच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी पुढाकार घेतला. खारपाणपट्टय़ातील काळी जमीन ज्वारी पिकासाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राच्या मदतीने खारपणपट्टय़ात खरीप व रब्बी हंगामात प्रत्येकी ५०० एकरवर ज्वारीचे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. ज्वारी संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. आर.डी. घोराडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले.

ज्वारीच्या उत्पादनात वाढ

खारपाणपट्टय़ातील क्षारयुक्त जमिनीत चांगले उत्पादन येऊ शकत नाही, असा समज आहे. मात्र, खारपाणपट्टय़ातील काळी जमीन रब्बी ज्वारीसाठी उपयुक्त ठरते. विद्यापीठाने केलेल्या प्रयोगात यावर्षी खरीप हंगामात एकरी १९ क्विंटल तर रब्बी हंगामात एकरी १२ ते १४ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न झाले. रब्बी हंगामातील ज्वारीला मोठी मागणी असून भाव देखील चांगला मिळतो. शिवाय कडब्याच्या माध्यमातूनही उत्पन्नात भर पडत आहे.

खारपणपट्टय़ातील शेतकरी परंपरागत पिकांवरच अवलंबून होते. ९० टक्केशेतकरी दुबार पीक घेत नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने ज्वारी पेरणीचा प्रयोग केला. खारपाणपट्टय़ातील जमीन ज्वारीसाठी चांगली आहे. ज्वारीचे भरघोस उत्पन्न झाल्याने प्रयोग यशस्वी झाला असून, शेतकऱ्यांसाठी तो दिशादर्शक ठरेल.

– डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.