25 September 2020

News Flash

शिक्षकांना बदल्यांचे वेध, सोशल मीडियाचा आधार!

शैक्षणिक वर्ष संपत असल्याने जि. प. शाळांमधील शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले असून, इच्छुकांनी आतापासूनच सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. परस्पर बदलीसाठी अनेकांनी वेगवेगळ्या ग्रुपवर

| April 12, 2015 01:20 am

शैक्षणिक वर्ष संपत असल्याने जि. प. शाळांमधील शिक्षकांना बदल्यांचे वेध लागले असून, इच्छुकांनी आतापासूनच सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. परस्पर बदलीसाठी अनेकांनी वेगवेगळ्या ग्रुपवर संपर्क सुरू केल्याने जिल्ह्यात तो चच्रेचा विषय बनला आहे. बदल्यांमधील गतवर्षीची अनियमितता लक्षात घेता यंदा मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उन्हाळी सुट्टीत म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षांला प्रारंभ होण्यापूर्वी दरवर्षी जि. प.च्या पात्र (कधी पात्र नसणारेही) शिक्षकांच्या बदल्या होतात. शासन निर्णयाचा सोयीचा अर्थ काढून दरवर्षी होणाऱ्या या बदल्यांमधून मोठी आर्थिक उलाढाल होते. विनंतीवरून, प्रशासकीय कारणांवरून, पती-पत्नी एकत्रीकरण, आजारी कारणांवरून तसेच परस्पर संमतीने या बदल्या होतात. तत्कालिन सीईओ परिमलसिंह  कुशवाह यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी बदल्यांमध्ये पारदर्शकता आणली होती. त्यांच्याच काळात कोणताही राजकीय आधार नसलेल्या अनेक शिक्षकांना न्याय मिळाला. पण गेल्या २-३ वर्षांत झालेली अनागोंदी, अनियमितता व मनमानीने नांदेड जि. प. राज्यात बदनाम झाली.
आपले कोणीच काही करू शकत नाही, अशा आविर्भावात काही महाभागांनी राजकीय पाठबळाच्या जोरावर चक्क सीईओंच्या बनावट सह्य़ा करून बदल्यांचे आदेश काढले. या प्रकरणात काहींवर गुन्हे दाखल झाले, काही शिक्षकांना अटकही झाली. पण सीईओंपर्यंत जाण्याचे धाडस ना जि. प. प्रशासनाने दाखवले ना पोलीस यंत्रणेने. गेल्या वर्षीचा घोळ लक्षात घेता यंदा बदल्या कशा होतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अन्य बदल्या कशा होतात, याकडे फारसे लक्ष न देता परस्पर बदलीसाठी काही शिक्षकांनी आतापासूनच शोधाशोध सुरू केली आहे. त्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅपचा खुबीने वापर केला जात आहे. सध्या कार्यरत असलेले ठिकाण, दळळवळणाची सोय आदी माहिती देऊन गाव कसे सोयीचे, हे संदेशाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखेरीस परस्पर बदलीसाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या ग्रुपवर फिरणारे हे पोस्ट सध्या जिल्ह्यात चच्रेचा विषय बनले आहे. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट-माहूर भागातून कार्यरत शिक्षकांकडून पाठवण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये पगारात मिळणाऱ्या आदिवासी भत्त्याचा विशेष उल्लेख केला जात आहे. बदल्यांसंदर्भात दरवर्षी राज्य सरकारकडून मार्गदर्शक परिपत्रक जारी केले जाते. हे परिपत्रक अजून निघाले नाही. जि. प. पदाधिकारी किंवा प्रशासनाने अजून तरी कोणतीही भूमिका जाहीर केली नाही. असे असले, तरी इच्छुक शिक्षक-शिक्षिका मात्र बदलीसाठी गुडघ्याला बािशग बांधून तयार आहेत.
एका शिक्षकाचे असेही जनहित!
जि. प. शाळेत कार्यरत एका शिक्षकाने अनेक ग्रुपवर ६२ इच्छुक व पात्र शिक्षकांची यादी जनहितार्थ पोस्ट केली. नेमणुकीचे ठिकाण, कालावधी, दळणवळणाची उपलब्धता, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिला. जिल्ह्याच्या ढासळलेल्या गुणवत्तेबाबत सीईओ अभिमन्यू काळे व अन्य अधिकारी विचारमंथन करीत असताना त्यांच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याबाबत उदासीनता दाखवणारे शिक्षक बदल्यांबाबत मात्र एवढे सक्रिय कसे, या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशीच तत्परता गुणवत्ता वाढीसाठी दाखवली असती, तर ते भूषणावह ठरले असते, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 1:20 am

Web Title: use social media for teacher transfer
टॅग Nanded,Social Media
Next Stories
1 अवकाळीचा कहर कायम
2 फरार शिक्षणसंस्थाध्यक्षासह चौघे शरण
3 अवकाळी पावसाने मराठवाडा कोंडीत
Just Now!
X