अनाथाश्रमात वाढलेला नगरचा मुष्टियोद्धा येत्या एक वर्षासाठी आता भारतीय क्रीडा प्राधिकरणात राहणार आहे. प्राधिकरणाच्या राष्ट्रीय स्तरावरील शोधमोहिमेतून त्याची निवड झाली असून या निवडीने त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली आहे. रातोरात ही कलाटणी मिळाली असली तरी त्यामागे त्याची गेल्या काही वर्षांची तपश्चर्या आहे.
उस्मान शेख या होतकरू खेळाडूने ही फिनिक्स भरारी मारली आहे. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरवलेला उस्मान अनाथाश्रमातच मोठा झाला. चार वर्षांपूर्वी त्याने राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि त्याच्या जीवनाला सुवर्णझळाळी प्राप्त झाली. आता तर त्याहीपुढे तो गेला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दोन महिन्यांपूर्वी गुणी खेळाडूंसाठी देशभर शोधमोहीम राबवली. विविध खेळांचा त्यात समावेश होता. स्थानिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या, मात्र खेळांच्या अन्य सोयीसुवधांपासून वंचित असलेल्या खेळाडूंना हुडकून त्यांना आंतरराष्ट्रीय खेळासाठी तयार करण्याचा हेतू या मोहिमेमागे होता. त्यातून नगरच्या उस्मानची मुष्टियुद्धासाठी निवड झाली आहे.
लहानपणापासूनच अनाथाश्रमात राहिलेल्या उस्मानच्या दृष्टीने ही त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी गोष्ट ठरली आहे. सन २०१० मध्ये त्याने राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत वेगळ्या दिशेने क्रीडाप्रवास सुरू केला. मात्र नेमका त्याच वेळी वयाची १८ वर्षे त्याने पूर्ण केली होती. सरकारी नियमानुसार त्याला त्यामुळे अनाथश्रमाचेही दरवाजे बंद झाले.  अठरा वयाच्या पुढच्या युवकांना अनाथाश्रमात राहता येत नाही. एकीकडे बारावीचे वर्ष आणि दुसरीकडे राहण्याचा ठिकाणा हरवून बसलेला. राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले त्या वेळी क्रीडाप्रेमींनी शहरातून त्याची मिरवणूकही काढली होती, मात्र अनाथाश्रमातून बाहेर पडायची वेळ आली, त्या वेळी कोणतीच मदत त्याला झाली नाही. अशाही स्थितीत त्याची धडपड सुरू होती. अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीचे तीन-चार महिने त्याने कोठल्यातील झोपडपट्टीत काढली. येथून बाहेर पडण्याची स्वप्ने तो पाहात होता, मात्र याही स्थितीत दुसरीकडे खेळाचा सरावही सुरूच होता. याच दरम्यान अशाच मुलांसाठी कार्यरत असलेल्या‘युवान’या संस्थेच्या तो संपर्कात आला. क्रीडा संघटक गफ्फार शेख यांनी त्याला मदत केली, या संस्थेने त्याचे पालकत्व स्वीकारले. राहण्या-खाण्याचा प्रश्न मिटताच उस्मान आणखी जोमाने खेळात लक्ष देऊ लागला. दरम्यानच्या काळात ‘युवान’च्या मदतीने त्याने उत्तम अभ्यास करून बारावीची परीक्षाही दिली.
हाच उस्मान आता एक वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षणासाठी निघाला आहे. पोलिसांचे क्रीडा प्रशिक्षक शकील शेख यांनी त्याला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या शोधमोहिमेची माहिती दिली होती. ही सुवर्णसंधी मानून सरावात आणखी कष्ट घेऊन जिद्दीने तो त्यात पात्र ठरला आहे. या यशाबद्दल सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले. येत्या तीन वर्षांत अशा शंभर युवकांचे पालकत्व घेण्याचा संकल्प युवानने केला असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त सतीश येवले यांनी दिली.