News Flash

करोनाचं विदारक वास्तव! एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार; स्मशानभूमीही पडली अपुरी!

उस्मानाबादमध्ये अंत्यसंस्कारांसाठी एकाच दिवशी स्मशानभूमीत आले २७ मृतदेह!

नगरमध्ये एकाच दिवशी ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागण्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच उस्मानाबादमध्ये असंच चित्र दिसून आलं आहे. उस्मानाबाद शहरानजीकच्या स्मशानभूमीमध्ये आज एकाच दिवशी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागाच शिल्लक नसल्याने अवघ्या एका फुटांवर सरण रचल्याचं विदारक दृश्य स्मशानभूमीत दिसत होतं. भीषण बाब म्हणजे अजून ८ मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी प्रतिक्षेत असताना केवळ सरणासाठी लाकडं अपुरी पडल्यामुळे हे मृतदेह दुसऱ्या दिवसापर्यंत ताटकळत ठेवण्याची दुर्दैवी वेळ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे. या प्रकारामुळे राज्यात वाढू लागलेल्या करोनाचं भीषण वास्तव समोर येऊ लागलं आहे.

अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी, लाकडं देखील अपुरी

गेल्या महिन्याभरात राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात मृतांचा आकडा देखील वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर करोनामुळे उस्मानाबाद शहराजवळच्या स्मशानभूमीवर भीषण चित्र दिसलं आहे. स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी तब्बल २७ मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र, स्मशानभूमीत तेवढी जागाच नसल्यामुळे अखेर अवघ्या एकेक फुटावर सरण रचण्याच आलं. लाकडं अपुरी असल्यामुळे थोडीच लाकडं प्रत्येक सरणावर रचण्यात आली आणि तब्बल १९ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. लाकडं संपल्यामुळे उरलेल्या ८ मृतदेहांवर दुसऱ्या दिवशी जादाची लाकडं आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची २४ तासात अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी वणवण!

उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ५९० रुग्ण सापडले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २२४ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ हजार ९४० झाली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सातत्याने करत आहेत.

उस्मानाबाद बनतंय करोनाचा हॉटस्पॉट

उस्मानाबाद शहर आणि तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १ लाख ७७ हजार ६१३ नमुने तपासले गेले. त्यापैकी २६ हजार ४६७ रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर २०.२४ टक्के झाला आहे. जिल्ह्यात २० हजार ८८४ रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर ७९.९९ टक्के आहे, तर ६४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर २.४४ टक्के इतका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 11:17 pm

Web Title: usmanabad corona cases cemetery space shortage for last rites on dead bodies pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 धक्कादायक! ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची २४ तासात अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी वणवण!
2 Maharashtra Corona Update : राज्यात आज ५८,९५२ नवे रुग्ण, २७८ रुग्णांचा मृत्यू!
3 “भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला आहे, पृथ्वीराज चव्हाणांची विरोधकांवर परखड टीका!
Just Now!
X