इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अफजल उस्मानी हा पोलिसांदेखत पळून जात असेल तर ही घटना निंदनीय आहे. न्यायालयाच्या आवारातून एक दहशतवादी पोलिसांना गुंगारा देत असेल तर हे सुरक्षा यंत्रणेतील अपयश असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे नाव न घेता केली.
वाशीम दौऱ्यावर जात असताना खराब हवामानामुळे मुख्यमंत्री चव्हाण आज काही काळ नागपुरातील हॉटेल रॅडिसनमध्ये थांबले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. उस्मानी हा इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी आणि अहमदाबाद बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. शुक्रवारी मुंबईतील मोक्का न्यायालयाच्या आवारातून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. या संदर्भात चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, भरदिवसा पोलिसांच्या तावडीत असलेला दहशतवादी पळून जातो, ही पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर घटना आहे. यामुळे सुरक्षा व्यवस्थेत झालेली कुचराई चव्हाटय़ावर आली आहे. या संदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. लवकरच दहशतवाद्याला मुंबई पोलीस अटक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक महिना उलटला तरी पोलिसांना मारेक ऱ्यांना पकडण्यात अपयश आले, असे वाटत नाही का, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची राज्य पोलीस चौकशी करीत असून आरोपींना पकडण्यासाठी १९ पोलिसांचे पथक कार्यरत आहेत. सर्व बाजूंनी मारेक ऱ्यांचा शोध घेतला आहे. राज्य पोलीस यंत्रणेला मारेकरी पकडण्यात यश न आल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा सध्या विचार नाही. सध्या राज्य पोलीस तपास करीत आहेत. सीबीआयकडे हा तपास सोपविल्यानंतरही त्यांना तपास कार्यात आपल्याच पोलिसांना मदत करावी लागणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी पोलिसांवर विश्वास ठेवून काम सुरू आहे.   
काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहुल गांधी यांचा विदर्भ दौरा पक्षाची बांधणी करण्यासाठी आहे. अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षबांधणीचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
राहुल गांधी यांनी मुंबईत असाच कार्यक्रम घेतला होता. त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भातील लोकप्रतिनिधी व नेत्यांशी २४ सप्टेंबरला नागपुरात संवाद साधणार आहेत, तर २५ सप्टेंबरला पुण्याचा दौरा करणार आहेत.
खराब हवामानामुळे दौरा रद्द
मुख्यमंत्री चव्हाण व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मुंबई येथून विमानाने वाशीमला जाणार होते, मात्र हवामान खराब असल्यामुळे त्यांना नागपुरात उतरावे लागले. नागपुरात हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये काही काळ मुक्काम केल्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास ते हेलिकॉप्टरने अमरावतीला जाऊन तेथून मोटारीने अकोला येथे जाणार होते. त्याच वेळी पुन्हा खराब हवामानामुळे दौरा रद्द करावा लागला आणि मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले. २४ सप्टेंबरला राहुल गांधी सुराबर्डीमधील मिडोज रिसॉर्ट येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत, त्या स्थळाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.