उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या उत्तमसिंह पवार यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बठकीत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दर्डामुळे काँग्रेसचे नितीन पाटील यांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. स्वत: पवार यांनी मात्र दर्डावर माझा रोष नाही, असे सांगत ‘ते प्रेसफुल्ल पॉवर पर्सन’ असल्याचे उपहासात्मक विशेषण त्यांना लावले. नाराजीनाटय़ बठकीस काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव गायके व माजी मंत्री नामदेवराव गाडेकर यांची उपस्थिती होती.
शहरातील सिडको परिसरात ही बैठक झाली. बठकीत पवार यांनी बंडखोरीचे संकेत दिले. अजून पक्ष सोडला नाही. एका ज्येष्ठ मंत्र्याने दोन दिवस वाट पाहा, उमेदवार बदलू शकतात, असे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत आदल्या दिवशी बाबुराव कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर करून दुसऱ्या दिवशी सुभाष झांबड यांना तिकिट दिल्याचे उदाहरण ताजे असल्याचे आवर्जून सांगितले. मात्र, पक्षाने योग्य न्याय न केल्यास पक्षापेक्षा जनता मोठी असते, या शब्दांत त्यांनी बंडखोरीचा इशारा दिला. शिवसेनेचा उमेदवार पडावा असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत नाही, अशी टीका करताना साटे-लोटय़ाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, भाषणात दर्डा यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले. कार्यकर्त्यांनी मात्र ‘दर्डा मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.
माजी जिल्हाध्यक्ष सदाशिवराव गायके यांनी, चांडाळ चौकडीने पवार यांची उमेदवारी कापली. कारण अशा काही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला, तर त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडता येईल. तसे झाले तर त्यांना परत दिल्लीत बोलावले जाईल व राज्यात मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होईल, असा काही जणांचा होरा आहे. त्यातून हे राजकारण शिजल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मराठा जातीचा उमेदवार दिला असल्याचा संकेत पक्षातील नेत्यांकडून दिला जात आहे. अशा प्रकारांमुळे समाजात अधिक तेढ निर्माण होईल, असेही गायके म्हणाले. चांडाळ चौकडीतील नेत्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
दोन दिवस प्रतीक्षा करूनही काहीच सकारात्मक निर्णय न झाल्यास कार्यकत्रे जे सांगतील, ते ऐकावे लागेल, असा इशारा पवार यांनी दिला. बठकीस राजेंद्र दाते पाटील, बबन िडडोरे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दर्डावर रोष
एका कार्यकर्त्यांने, नेत्यांनी ठरविलेला उमेदवार मान्य नाही. उद्या ‘लोकमत’समोर जाऊन आंदोलन करू, असे म्हटले. मध्येच एक जण उठला, त्याने ‘दर्डा मुर्दाबाद’ची घोषणा दिली. काँग्रेसला बरबाद करण्यासाठीच पाटील यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करताना दर्डा यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला. तथापि, पवार यांनी त्यांच्यावर थेट आरोप करण्याचे टाळले.
खेळी पालकमंत्र्यांची, बदनाम दर्डा!
लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरविताना पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे नितीन पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र, उमेदवारी जाहीर होताच दर्डा यांच्यामुळे पवार यांना उमेदवारी न मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. राजकीय खेळीत दर्डाबाबत निर्माण होणारी नाराजी काही आमदारांना सुखावणारी असल्याने पवारांच्या नाराजी नाटय़ाच्या तोफेच्या तोंडी दर्डाना ठेवण्यात काँग्रेसच्या धुरिणांना यश आले. लोकसभा निवडणुकीत जातीच्या गणितात नितीन पाटील योग्य उमेदवार असल्याचा दाखला एका आमदाराने दिला. तत्पूर्वी वर्षभरापासून पाटील यांच्या नावाने उमेदवारीचे चित्र रंगविले जात होते. पालकमंत्री थोरात, आमदार अब्दुल सत्तार यांनीही पाटील यांचेच नाव योग्य असल्याचे सांगितल्याने उमेदवारी दिली गेल्याची चर्चा आहे.
गमतीची विधाने
उमेदवारी न मिळालेल्या पवार यांनी मंगळवारच्या बठकीत अनेक गमतीची विधाने केली. ते म्हणाले, अण्णा हजारे व मुख्यमंत्री जेवढे प्रामाणिक आहेत, तेवढाच मी आहे. औरंगाबादचा केजरीवालही मीच आहे आणि राजू शेट्टी देखील मीच.