पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण आणि पुण्यात मेट्रो रेल्वेचं भूमिपूजन होणार आहे. एकीकडे भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेकडून बहिष्कार टाकण्यात आला असताना दुसरीकडे उत्तर भारतीय महापंचायतने मोदींच्या दौऱ्य़ाला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोदींच्या दौऱ्याला होणारा विरोध हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर होत आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत भाषण केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रोजगार उपलब्ध न होण्याला तेथील नेते जबाबदार असल्याची टीका केली होती. उद्योगधंदे आणू न शकणारे उत्तर प्रदेशचे नेते अयशस्वी आहेत. जे पंतप्रधान झाले त्यातील 70 ते 80 टक्के उत्तर प्रदेशचे होते. तुम्ही जे प्रश्न आहेत ते त्यांना का विचारत नाहीत. पंतप्रधान पदासाठी मतदारसंघ चालतो मग रोजगार का मिळत नाही. याचं कोणाकडेही उत्तर नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली होती.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी

यानंतर उत्तर भारतीय महापंचायत समितीने उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. जोपर्यंत रोजगार देत नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश करु देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली होती.

जोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोजगार आणि उद्योगधंदे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कोणत्याही आमदार आणि खासदाराला मुंबई, महाराष्ट्रात प्रवेश करु देणार नाही. आमच्या लोकांना येथे येऊन अपमान सहन करावा लागतो. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेत आहोत असं उत्तर भारतीय महापंचायत समितीने जाहीर केलं होतं.