सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्जन, नेत्ररोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, दंतचिकित्सक आदी पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असूनही आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांकडून होत आहे. आरोग्यमंत्री सिंधुदुर्गचे सुपुत्र असूनही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्याबाबत गंभीर नसल्याने जनतेत नाराजी आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सर्जन, नेत्ररोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, दंतचिकित्सक ही पदे रिक्त आहेत, तर डॉ. गुलिस्तान सय्यद, डॉ. एस. व्ही. मांगलेकर आदी डॉक्टर गैरहजर आहेत.  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी गोरगरीब जनता सतत येत असते. तसेच अपघात, भाजणे किंवा अन्य गंभीर रुग्णदेखील दाखल होत असतात. सर्जन, भूलतज्ज्ञसारखी पदे रिक्त ठेवून सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड चालविली आहे. खरे तर सर्जन व भूलतज्ज्ञाची खरी गरज या रुग्णालयाला आहे. अपघात घडला, भाजल्यासारखा प्रकार झाला तर रुग्णांना थेट बांबुळीला जावे लागते. बांबुळीला बाहेरचो म्हणून हिणवलेही जाते. राजीव गांधी आरोग्यदायी योजना महाराष्ट्र सरकारने बांबुळी मेडिकल कॉलेजमध्ये राबविण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात येत आहे.  हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी भूषणावह नाही. गोवा बांबुळी रुग्णालयात ओळख नसेल तर रुग्णांची हेळसांड केली जाते, असे अनेक रुग्णांचे नातेवाईक बोलताना स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालय बांबुळीवर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही निर्माण होत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा सहकारी रुग्णालय कार्यरत होते. त्याशिवाय हे रुग्णालय शंभर कॉटचे आहे. फक्त वैद्यकीय सुविधाअभावी रुग्णालयाबाबत नाराजी आहे. या ठिकाणी ट्रॉमा सेंटर निर्माण करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. शासनानेच या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यासाठी हालचाल केली, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. खरे तर अभिनव फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर शासनाने ट्रॉमा केअर सेंटरला प्राधान्य दिले. पण त्यानंतर शासनाने निविदा काढल्या.