30 September 2020

News Flash

रिक्त पदांमुळे शिक्षण विभागाचा खेळखंडोबा

माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन तर निरंतरचेही एक पद रिक्त असल्याने शिक्षण विभाग रिक्त पदांमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

| December 22, 2014 01:55 am

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यासह मंजूर असलेले उपशिक्षणाधिकाऱ्यांची चार आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची आठ तर मुख्याध्यापकांची तब्बल ४५ पदे मागच्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. माध्यमिक विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन तर निरंतरचेही एक पद रिक्त असल्याने शिक्षण विभाग रिक्त पदांमुळे पूर्णपणे कोलमडून गेले आहे. निम्न दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे पदभार सोपवून वेळ काढण्याचा प्रकार सुरू आहे. शिक्षण विभागातील अनियमितता आणि गरप्रकारांच्याच चर्चा होतात. प्रत्यक्षात काम करण्यासाठी अधिकारीच नाहीततर कामकाज होणार कसे आणि गुणवत्ता राखणार कशी, असा प्रश्न मात्र शासनालाही पडत नाही.
बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून बदल्या, पदोन्नत्या आणि अनियमिततेबाबत कायम माध्यमांच्या बातमीत आहे. जिल्हा परिषदेच्या निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे शासनाने नियुक्ती दिली, तरी अधिकारी, कर्मचारी जिल्ह्य़ात येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे तब्बल वर्षभरापासून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार तात्पुरत्या स्वरूपातच कोणाच्या तरी खांद्यावर टाकून वाहिला जातो. वर्षभरापूर्वी नियुक्ती केलेल्या बाहेर जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी आपली बदली रद्द करून घेतली. तेव्हापासून सेवानिवृत्तीला आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पदभार देऊन वेळ निभावली जात आहे. वर्षभरात तब्बल चार जणांकडे पदभार देण्यात आला तर मंजूर असलेल्या ११ गटशिक्षणाधिकाऱ्यांपकी केवळ तीन पदे भरलेली आहेत. तब्बल आठ ठिकाणी अतिरिक्त पदभार देऊन काम ओढलेजाते. वर्ग २ ची मुख्याध्यापकांची मंजूर असलेल्या ६० पकी तब्बल ४५ पदे रिक्त आहेत. केवळ १५ ठिकाणीच मुख्याध्यापक कार्यरत आहेत. हीच परिस्थिती माध्यमिक विभागाची असून दोनही शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर निरंतर शिक्षणालाही अधिकारी नाही. त्यामुळे प्रशासकीय कारभाराचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे पदभार देऊन वरिष्ठ अधिकारी काम करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातून अनियमितता आणि गरप्रकारही वाढतात. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करूनही शासन रिक्त पदे भरत नाही. लोकप्रतिनिधींना आपले काम झाले पाहिजे. पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय यंत्रणेने आपले ऐकले पाहिजे असे वाटते मात्र शिक्षण विभागात काम करायलाच अधिकारी नाहीत, याचे मात्र सोयरं-सुतक नसतं. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.
शिक्षण विभागाची रिक्त पदांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळांची गुणवत्ता कशी राखणार असा प्रश्न मात्र पदाधिकाऱ्यांना आणि शासनालाही पडत नाही, हे विशेष.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 1:55 am

Web Title: vacant post education dept mess
Next Stories
1 रॅगिंग करणाऱ्यांवर पाच वर्षांची बंदी
2 आज राज्यात प्रथमच पाणपक्ष्यांची प्रगणना
3 तिघा युवकांना १० दिवस पोलिस कोठडी
Just Now!
X