|| निखील मेस्त्री

तुटवडा कायम; लस मिळत नसल्याने नाराजी

पालघर :  जिल्ह्यत लसींचा तुटवडा कायम असून लस उपलब्ध न झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यतील बहुतांश लसीकरण केंद्रे शुक्रवारपासून बंद ठेवण्यात आली. जिल्ह्यत एकीकडे रुग्ण संख्येचा आलेख वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेग मंदावल्याने सर्वत्र नाराजी आहे.

वसई-विरार महानगरपालिकेसह एकूण ८८ लसीकरण केंद्र असून यातील ७१ केंद्रे पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. शुक्रवापर्यंत ग्रामीण भागातील १३ तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील १७ लसीकरण केंद्रे सुरू होती. पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती औषध भांडारात एकही लसीची कुपी शिल्लक नसल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे.  तसेच ज्या केंद्रांमध्ये  लसींचा साठा आहे तोही संपत आल्यामुळे येत्या दोन दिवसात ही केंद्रेही बंद करण्याची वेळ ओढावणार आहे.  लसींचा तुटवडा जाणवत असल्याने खासगी लसीकरण केंद्रांचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. मिलिंद चव्हाण यांनी दिली आहे. खासगी केंद्रांनी थेट उत्पादक कंपनीकडून लसींच्या कुप्या उपलब्ध करून घ्यावयाच्या आहेत, अशा सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रात दररोज २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे तर दररोज सुमारे सहा हजार ६०० नागरिकांचे लसीकरण होत आहे. पालघर जिल्ह्य़ाने सुमारे आठ लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यातीन दोन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र वारंवार लसीकरण मोहीम लसींअभावी खंडित होत असल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे.  यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दररोज लसीकरण केंद्राबाहेर लसी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र केंद्राबाहेर लसी उपलब्ध नसल्याचे पाटय़ा पाहिल्यानंतर नागरिक हताश होऊन माघारी फिरत आहेत. मात्र, शुक्रवारी  पालघर जिल्ह्यात तलासरी, उधवा, विक्रमगड , मलवाडा कुरझे, तलवाडा तसेच डहाणू तालुक्यात  उपजिल्हा रुग्णालय , डहाणू नगर परिषद, चिंचणी, वाणगाव, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, ग्रामीण रुग्णालय मोखाडा, वाडा, मनोर आदी ठिकाणी लसीकरण सत्र सुरू होते, अशी माहिती देण्यात येते.

नोंदणी केलेल्यांनाच लस

१८ वर्षे वयापासूनच्या  नागरिकांचे लसीकरण करण्याची पूर्वतयारी सुरू आहे.  ज्या नागरिकांनी कोविन व आरोग्य सेतू अ‍ॅपवर लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी केलेली आहे अशानाच लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी होणारी गर्दीची शक्यता पाहता शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यत प्रथम टप्प्यात पाच केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यत उपजिल्हा रुग्णालय डहाणू, ग्रामीण रुग्णालय वाडा, उपजिल्हा रुग्णालय जव्हार तर पालघर शहरातील भगिनी समाज शाळा  येथे लसीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील. पुढे केंद्रे वाढविण्यात येतील, अशी माहिती समन्वयक डॉ.मिलिंद चव्हाण यांनी दिली.