दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : करोना लस पुरवठय़ावरून एकीकडे राजकारण रंगले असतानाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हृयांमध्ये लसीकरणाने वेग घेतला असून आतापर्यंत ४५ वर्षांवरील पन्नास टक्के लोकांचे पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाले आहे. मुंबई, पुणे ही महानगरे वगळता राज्यात या तीन जिल्हयांनी आघाडी घेतली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे मोलाचे योगदान तर आहेच, पण या दिशेने काम केले तर करोनावर मात करता येऊ शकते हा आदर्शही घालून दिला आहे.

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका समोर उभा ठाकला आहे. करोना साखळी तोडण्यासाठी शासन टाळेबंदीच्या निर्णयाप्रत आले आहे. रोजी रोटीचा प्रश्न असल्याने व्यापाऱ्यासह रोजंदारी करणारे, फे रीविक्रेते धास्तावले आहेत. गतसालचा महापूर आणि त्यानंतर ही करोनाची महासाथ यामुळे धास्तावलेपणा स्वाभाविकच आहे. कारण मदतीचा हात मिळालाच तर जिथं आभाळच फाटणार आहे तिथं ठिगळ किती आणि कशा कशा लावायचे हा यक्ष प्रश्न आवासून समोर उभा ठाकला आहे.

शासकीय पातळीवरून सातत्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिक झाल्यानंतर आता ४५ वर्षांवरील सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणामध्ये सुलभता असल्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हृयात या मोहिमेने गती घेतली आहे. यामागे सुयोग्य नियोजन जसे कारणीभूत आहे तसेच लोकांमध्ये करण्यात आलेली जागृती आणि राजकीय पक्षाकडून लाभार्थीसाठी करण्यात येत असलेली सुविधाही मोलाची ठरली आहे.

महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या १० आरोग्य केंद्रांसह ३० ठिकाणी शहरातील नागरिकांचे लसीकरण केले जात असून यामध्ये काही खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. याचे नियोजन लसीकरण नियंत्रण अधिकारी डॉ. वैभव पाटील हे करीत आहेत. महापालिका क्षेत्रामध्ये रोज अडीच ते तीन हजार लाभार्थीचे लसीकरण होत असून यासाठी लाभार्थींनी केवळ आधारकार्ड सोबत आणणे गरजेचे आहे अशी माहिती डॉ.अक्षय पाटील यांनी दिली.

जिल्ह्य़ात ४५ वर्षांवरील सुमारे साडेसात लाख लाभार्थी निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत यापैकी ३ लाख ७ हजार ४८० जणांचे लसीकरण पूर्ण झाले असून यापैकी २१ हजार ७१४ जणांना दुसरी मात्राही देण्यात आली आहे. रोज सुमारे १८ ते २० जणांना लस देण्यात येत असून लस जर मागणीप्रमाणे उपलब्ध झाली तर एप्रिलअखेर पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.

– डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी.

जिल्ह्य़ामध्ये २४२ केंद्रावर लसीकरण करण्यात येत असून एका व्यक्तीला केवळ अर्धा मिली मात्रा दिली जाते. एका कुपीमध्ये पाच मिलीलिटर औषध असून या कुपी फोडल्यानंतर दहा लाभार्थींना चार तासाच्या आत  लशीची मात्रा देणे आवश्यक असते. अन्यथा कुपी फोडल्यानंतर लसीची मात्रा खराब होते. जिल्ह्य़ात लस खराब होण्याचे प्रमाण केवळ सव्वा दोन टक्के आहे.

– डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी.