पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यतील शुक्रवारी तीन ठिकाणी करोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यत करोनाप्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय आणि हातखंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी शुक्रवारी लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. त्यामध्ये ७५ लाभार्थींसह प्रातिनिधिक स्वरुपात तालीम झाली. ती यशस्वीपणे पार पडल्यामुळे येऊ घातलेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे, असा विश्वास जिल्हा आरोग्य व यंत्रणेतर्फे व्यक्त करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस.कमलापूरकर यांनी हातखंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एम.डी. गावडे, डॉ. ओंकार निमकर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नल साळवी उपस्थित होते. या तालमीसाठी ७५ लाभार्थ्यांची नोंदणी करुन त्यांना लसीकरणाचे ठिकाण व वेळ मोबाईलवरून संदेशाद्वारे अगोदर कळवण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी लसीकरण केंद्रावर आलेल्या लाभार्थींची प्रथम नोंदणी करुन नंतर लसीकरण कक्षात पाठवण्यात आले. त्या कक्षामध्ये संबंधित लाभार्थीची पुन्हा पडताळणी करुन लसीकरण केल्यानंतर देखरेख कक्षामध्ये अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. आरोग्यविषयक काही गुंतागुंत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना घरी जाऊ देण्यात आले.

सर्वश्री डी.डी.जोशी, डी.डी.सुर्वे, डी.डी.गोताड, एस.ए.चव्हाण यांनी लसीकरण अधिकारी म्हणून काम पाहिले, तर व्ही.एस. देसाई यांनी लस देण्याची जबाबदारी सांभाळली.