प्रबोध देशपांडे

‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळत नसल्याने नागरिकांना मन:स्ताप

अकोला : पश्चिम विदर्भात ढिसाळ नियोजनामुळे लसीकरणाचा गोंधळ कायम आहे. ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळत नसल्याने नागरिकांना मन:स्तापाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे लसीकरण केंद्रांवरील प्रचंड गर्दी होत असल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढत आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात शनिवापर्यंत १३ लाख ५२ हजारांवर नागरिकांनी लशीची मात्रा घेतली.

१ मेपर्यंत १८ वर्षांंवरील सर्वासाठी लसीकरण सुरू झाल्याने लाभार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. त्या तुलनेत लशींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी मारामारी आहे. लसीकरणासाठी ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ म्हणजे लसीकरण केंद्र, वेळ याची पूर्वनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले. गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेली ही उपाययोजना निष्फळ ठरली. लसीकरण केंद्रावर एकाच वेळी २५० ते ३०० लोकांची गर्दी होतच आहे. त्यामुळे ‘अपॉइंटमेंट स्लॉट’चा काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी कोविड केंद्र किंवा करोना तपासणी केंद्र आहेत. त्यामुळे या गर्दीतून करोनाचा समूह संसर्ग होण्याचा अधिक धोका आहे. सध्या मोजक्याच केंद्रांवर मर्यादित स्वरूपात लसीकरण सुरू आहे. ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ नागरिकांची चढाओढ असते. ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रावरील लसीकरण बंद पडले. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना लशीची मात्रा घेण्यासाठी शहरी भागातील लसीकरण केंद्राकडे धाव घ्यावी लागत आहे. परिणामी, लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी उसळत असून शारीरिक अंतर नियमाचा संपूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. अनेक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली, मात्र दुसऱ्या मात्रेसाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. लशींच्या अल्प साठय़ामुळे लसीकरणाचे खासगी केंद्र बंद आहेत. लसीकरणाचा संपूर्ण भार शासकीय केंद्रांवरच आहे. लसीकरणाचा प्रचंड भोंगळ कारभार सुरू असून वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ जिल्हय़ात आतापर्यंत १३ लाख ५२ हजार ६५८ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यात पहिली मात्रा ११ लाख १९ हजार ११३ लाभार्थ्यांनी घेतली, तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांची संख्या दोन लाख ३३ हजार ५४२ आहे. सर्वाधिक तीन लाख ४० हजार ८०१ जणांचे लसीकरण अमरावती जिल्हय़ात झाले आहे.

अकोला दोन लाख २६ हजार २१९, बुलढाणा तीन लाख १४ हजार ८६५, वाशीम एक लाख ७२ हजार ४१४ व यवतमाळ जिल्हय़ात दोन लाख ९८ हजार ३५९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. गत काही दिवसांमध्ये अल्प प्रमाणात मंदगतीने लसीकरण सुरू आहे. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सुसज्ज नियोजनानुसार लसीकरणाची गती वाढविण्याची गरज आहे.

काही सेंकदात ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ फुल्ल

लसीकरणासाठी ऑनलाइन ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ घेणे आवश्यक आहे. याची प्रक्रिया संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरून केली जाते. प्रत्येक जिल्हय़ात दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणासाठी विशिष्ट वेळेत ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ खुला करण्यात येतो. काही सेकंदामध्ये लसीकरणाचा कोटा फुल्ल होतो. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाच पडते.

१७.२६ टक्के लाभार्थ्यांनाच दुसरी मात्रा

पश्चिम विदर्भातील लसीकरण घेतलेल्या एकूण नागरिकांच्या तुलनेत १७.२६ टक्के लाभार्थ्यांनाच आतापर्यंत दुसरी मात्रा मिळाली आहे. कोव्हॅक्सिन लसचा साठा कमी प्रमाणात आला आहे. पहिली मात्रा या लसची घेतली, त्यांना दुसऱ्या मात्रेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही लाभार्थ्यांनी पहिली मात्रा खासगी केंद्रावर घेतली. आता खासगी केंद्र बंद आहेत. शासकीय केंद्रांवर ‘अपॉइंटमेंट स्लॉट’ मिळत नसल्याने दुसऱ्या मात्रेसाठी लाभार्थ्यांची चांगलीच कोंडी होत आहे.