खाजगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा पैसे आकारणी

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोना काळात वसई-विरारमध्ये लहान बालकांच्या लसीकरणावर परिणाम झाला आहे. करोनामुळे बालकांना लसीकरण केंद्रात नेता येत नसल्याने बाकालांचे लसीकरण रखडले आहे. त्यातही शासकीय लसीकरण केंद्र बंद असल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

लहान मुलांचे आजारापासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे लसीकरण महत्त्वाचे असते. त्यात बीसीजीची लस अनिवार्य आहे. मात्र आता करोनाचा वाढता संसर्ग पाहता एक वर्षांखालील मुलांना लसीकरणासाठी घराबाहेर न्यायचे की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना कोणत्याही आजाराची लागण होण्याची भीती सर्वाधिक असल्याने आणि सध्याचे करोनाचे वातावरण असल्याने पालकांनी धास्ती घेतली आहे. तर दुसरीकडे पालिका आरोग्य केंद्रात लसीकरण बंद असल्याने पालकांना खाजगी दवाखान्याकडे जावे लागत आहे. तिथे त्यांना अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जात असल्याची माहिती काही पालकांनी दिली.

खाजगी रुग्णालयात अथवा दवाखान्यात लसीकरणाचे दर अधिक असल्याने नागरिकांचा कल शासकीय रुग्णालयाकडे अथवा आरोग्य केंद्राकडे अधिक असतो. पण सध्या वसई-विरारमध्ये करोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि इतर आजारावरील बा रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू आहेत. लसीकरणासाठी पालकांच्या बाळाला घेऊन रांगा लागत असल्याने सुरक्षा म्हणून तात्पुरती लसीकरण सेवा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका वैद्यकीय  अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांनी दिली आहे. छोटय़ा- छोटय़ा शिबिरात या लसी दिल्या जात आहेत. तसेच एकदा पालक बाळाला घेऊन आल्यास आम्ही या लसी देत आहोत असे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच बालकांना नियमितपणे कशा प्रकारे लसी दिल्या जातील याची व्यवस्था करत आहोत असेही, त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित सामंत यांनी माहिती दिली की, करोनाचा काळ कमी होताना दिसत नाही. यामुळे पालकांनी आवश्यक लसी बाळाला द्याव्यात, यात पालकांनी लसीकरण करताना काही बाबींची काळजी घ्यावी. बाळाची लसीकरण पुस्तिका सोबत ठेवावी, एक वर्षांखालील मुलाला कपडय़ात व्यवस्थित गुंडाळावे, शक्यतो खाजगी वाहनांचा वापर करावा, पालकांनी हातमोजे आणी मुखवटा वापरावा,  दीड वर्षांवरील मुलांना मास्क वापरावा, लसीकरण करताना आणि नंतर सामाजिक अंतराचे पालन करावे, घरी गेल्यावर मुलांचे कपडे बदलून टाकावे, तसेच पालकांनी हात निर्जंतुक केल्याशिवाय बाळाला हात लाऊ  नये अशी काळजी घ्यावी.

पालकांसमोरील पेच

पालकांच्या चिंता मात्र वाढतच आहेत. कारण लहान बाळाला मास्क घालणे शक्य नाही,  त्यांना केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनाची सुविधा नाही, लसीकरण केल्यानंतर बाळाला त्याची अ‍ॅलर्जी होत तर नाही ना हे पाहण्यासाठी किमान अर्धा तास तरी केंद्रात उभे राहावे लागते. यामुळे गर्दीचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक बाळांचे लसीकरण रखडले आहे.