News Flash

एक दिवसापुरताच लस पुरवठा

महापालिकेची एका आठवड्यासाठी किमान एक लाख लसी मिळाव्यात अशी मागणी आहे.

कचरावेचकांनाही पहिली मात्रा

औरंगाबाद : करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने जास्तीत जास्त लसीकरण करण्याची तयारी केली आहे. दररोज १५ हजार लसीकरण होऊ शकेल, अशी क्षमता आहे. पण शासनाकडून एक दिवस पुरतील एवढ्याच लसी मिळत आहेत, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, शहरातील कचरावेचकांनाही लस मात्रा दिली जावी यासाठी महापालिकेकडून प्रयत्न होत आहेत.

शहरातील नागरिकांना करोना प्रतिबंध लस देण्यासाठी महापालिकेने ११५ वॉर्डात प्रत्येकी एक, दोन सरकारी व २६ खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था केली होती. पाच एप्रिलपासून जम्बो लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. एका दिवसात विक्रमी म्हणजेच दहा हजारापेक्षा जास्त लसीकरण महापालिकेने केले. पण गेल्या काही दिवसांपासून लसींचा तुटवडा जाणवत आहे.

महापालिकेची एका आठवड्यासाठी किमान एक लाख लसी मिळाव्यात अशी मागणी आहे. मात्र शासनाकडून कधी पाच, कधी दहा हजार अशा लसी दिल्या जात आहेत. लसीकरणासंदर्भात पांडेय म्हणाले,की महापालिकेने रोज १५ हजार लसीकरण करण्याची तयारी करून ठेवली आहे. पण लसींचा तुटवडा असल्याने सध्या ठरावीक केंद्रावरच लसीकरण केले जात आहे. ३० जूनपर्यंत लसींचा तुटवडा राहील, असा अंदाज  पांडेय यांनी व्यक्त केला.

अडीच लाखांचा टप्पा पूर्ण

लसीकरणाचा महापालिकेने अडीच लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुमारे चार महिन्यात दोन लाख ५६ हजार १५४ जणांना लस दिल्याचे महापालिकेने रविवारी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:05 am

Web Title: vaccine supply for one day only akp 94
Next Stories
1 कोविडच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याबाबतची याचिका फेटाळली
2 औरंगाबाद शहरातील रुग्णसंख्या ओसरू लागली
3 तंत्रस्नेही शहरी नागरिकांचा ग्रामीण भागातील लशींवर ताबा
Just Now!
X