मनपा आयुक्त शंकर गोरे यांचा आदेश

नगर : महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सक्तीने करोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. जे कर्मचारी लस घेणार नाहीत, त्यांचे मासिक वेतन स्थगित करण्याचे आदेश मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिले आहेत. त्याबरोबरच लसीकरण केले नसल्यास व करोना आजाराने कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला ५० लाख रुपयांचे सुरक्षाकवच मिळणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात आज, गुरुवारी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त गोरे, संघटनेचे पदाधिकारी अनंत लोखंडे व आनंदराव वायकर यांची बैठक झाली. त्या वेळी वरील निर्णय घेण्यात आल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

करोनामुळे मनपाचे कायम सेवेतील ७ व मानधनावरील १ असे आठ जणांचे, तर गेल्या २४ तासात श्रीमती उपन पुस्टर चव्हाण व सुनील रावसाहेब सोनवणे या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सभा झाली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर वाकळे, आयुक्त गोरे, सभापती अविनाश घुले, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व यशवंत डांगे आदी उपस्थित होते.

मनपा कार्यालयातून ५० टक्के उपस्थिती व अभ्यागतांना कार्यालयातून प्रवेशबंदी लागू करण्याचे आदेश आयुक्त गोरे यांनी तत्काळ दिले. मनपा कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर टाकण्यात आली. विभाग प्रमुखांनी त्यामध्ये हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाच्या कारवाई इशारा त्यांनी दिला.

साई एशियन रुग्णालयावर कारवाईचा आदेश

मनपा कर्मचारी तृप्ती राकेश चव्हाण यांचे करोना आजारपणात निधन झाले. परंतु त्यांनी बिल न भरल्याचे कारण देत तारकपूरमधील साई एशियन रुग्णालयाने त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र अडवून ठेवले आहे. ते अद्याप त्यांच्या नातेवाइकांना मिळाले नाही, अशी तक्रार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी आयुक्त गोरे यांच्याकडे केली. त्यावर आयुक्तांनी तातडीने संबंधित रुग्णालयावर कारवाईचे आदेश दिल्याचे लोखंडे यांनी स्पष्ट केले.