07 March 2021

News Flash

वाडय़ातील फटाके विनापरवाना

टाळेबंदीमुळे गत सात महिन्यांत परवान्यांचे नूतनीकरण नाही

टाळेबंदीमुळे गत सात महिन्यांत परवान्यांचे नूतनीकरण नाही

रमेश पाटील, वाडा

वाडा : एके काळी वाडा कोलमने वाडा तालुक्याचे नाव सर्वदूर पसरविले असतानाच वाडा शहरात कोटय़वधी रुपयांची विक्री होणाऱ्या वाडा फटाकामुळे वाडा शहराचे नाव राज्यभरात पसरू लागले आहे. मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या येथील सर्वच घाऊक फटाका विक्रेत्यांच्या परवान्यांची मुदत सात महिन्यांपूर्वीच संपली असून गेल्या सात महिन्यांत या विक्रेत्यांना टाळेबंदीमुळे परवाने नूतनीकरण करून मिळालेले नाहीत. मात्र दिवाळी उत्सव जवळ आल्याने या विक्रेत्यांनी विनापरवाना व्यवसाय सुरूच ठेवले आहेत.

वाडा येथे दिलीप ट्रेडर्स, श्री सिद्धी विनायक सेल्स एजन्सी, प्रीतम सेल्स एजन्सी, प्रसाद ट्रेडर्स व नंदकुमार ट्रेडर्स हे प्रमुख पाच फटाक्यांचे मोठे घाऊक विक्रेते असून या पाचही एजन्सींकडून वर्षभर फटाक्यांचा व्यवसाय सुरू असतो.

दसरा ते दिवाळीपर्यंत या पाचही दुकानांमधून ठाणे, रायगड, नाशिक, पालघर या जिल्ह्यांसह मुंबईतील काही शहरांमधील किरकोळ विक्रेत्यांना याच एजन्सींकडून फटाके पुरविले जातात. फटाक्याच्या व्यवसायात करोडो रुपयांची उलाढाल वाडा शहरात होत असल्याने राज्यभरात वाडा शहराची फटाक्यांचे शहर म्हणून ओळख होऊ लागली आहे.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हा व्यवसाय येथे वर्षभर चालू असतानाही या व्यावसायिकांकडून आवश्यक त्या परवानग्या व सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याने हे व्यावसायिक नेहमीच वादात सापडले आहेत. गतवर्षी येथील नगरपंचायत प्रशासनाने या व्यावसायिकांच्या दुकानांना ऐन दिवाळीत टाळे ठोकले होते, तर या वर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी या व्यावसायिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

येथील फटाके व्यावसायिकांची दुकाने शहराबाहेर असली तरी त्यांनी बांधलेली गोदामे व या गोदामांमध्ये मोठय़ा प्रमाणात साठा केलेले फटाके यामुळे ही ठिकाणे सुरक्षित नाहीत. तसेच गोदामे ज्या ठिकाणी आहेत त्या सर्व जागा या तानसा वन्यजीव अभयारण्य परिसरातील बंदी घातलेल्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहेत. त्यामुळे याबाबतीत चौकशी करावी, अशी मागणी नीलेश चव्हाण यांनी केली आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

शिवकाशी (तमिळनाडू) येथून फटाक्यांचा माल वाडा येथे आणून तो ग्रामीण भागात बांधलेल्या मोठमोठय़ा गोदामांमध्ये साठवणूक केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा येथे सुरू असलेला फटाका विक्री व्यवसाय हा शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच केला जातो व या फटाका विक्रीतून मोठय़ा प्रमाणात कररूपाने निधी शासनाला भरणा करण्यात येतो, असा दावा येथील फटाका विक्रेत्यांनी केला आहे. तर सुरक्षेसंदर्भात येथील फटाका विक्रेत्यांकडून अग्निशमन दल तसेच अन्य उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असे तक्रारदार नीलेश चव्हाण यांनी केलेल्या लेखी तक्रारीत म्हटलेले आहे.

फटाका विक्री व्यवसाय शासनाच्या नियमांचे पालन करूनच केला जातो. तसेच या व्यवसायाच्या माध्यमातून येथील शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.

– दिलीप पातकर, दिलीप ट्रेडर्स, फटका विक्रेता, वाडा

एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर स्फोटक वस्तूंचा होणारा हा व्यवसाय विनापरवाना कसा सुरू आहे, शासनाने याची चौकशी करावी. स्थानिक महसूल अधिकारी गप्प का आहेत?

– नीलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता, वाडा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 2:05 am

Web Title: vada firecracker vendors licenses not renewed in the last seven months zws 70
Next Stories
1 शहरबात : संन्याशीच सुळावर का?
2 घोडीचे अवयव तारेने शिवण्याचा प्रकार प्राणिमित्रांकडून उघड
3 बँक हॅकर्सच्या आंतरराज्य टोळीचे जाळे उद्ध्वस्त
Just Now!
X