चांगले वळण लागण्यासाठीच शिक्षक विद्यार्थ्यांना रागवतात. विद्यार्थीदशेत ज्या शिक्षकांनी नकार ऐकण्यास शिकविले त्यांचे महत्त्व पुढेच पटते, असा स्वानुभाव ‘तुझं माझं जमेना’ मालिकेतील अभिनेता वैभव तत्त्ववादी याने व्यक्त केले.     
सावंगी येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात ब्लिट्झ क्रिग-२०१४ या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्याने हे विचार मांडले.  तो पुढे म्हणाला, सर्वच आपल्याला सन्मान देतील असे होत नाही, पण वाटचाल सोडायची नाही. जीवनात एक ध्येय असणे आवश्यक आहे. ध्येय ठेवा व ते साध्य करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करा. पालक हे आपले मित्र असतात, याची खात्री बाळगा. त्यांना
फसवू नका. फ सवून मोठे होता येत नाही. पालकांचा आदर करा. शिक्षकांचे ऐका, असा सल्लाही वैभव तत्ववादीने या वेळी विद्यार्थ्यांना दिला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित कपिलांश धातू उद्योगाचे मुकुंद मोहता यावेळी म्हणाले की, मूर्तीकाराप्रमाणे जीवनात गुरूचे महत्त्व असते. स्पर्धेत जबाबदारी घेऊन काम करण्याचा पुढील जीवनात उपयोग होतो. कर्तृत्ववान मनुष्य काय बोलतो, यापेक्षा तो काय करतो याचे निरीक्षण करा. अशा स्पर्धेत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग प्रथमच पाहण्यात आल्याचे गौरवोद्गार मोहता यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. एस.पी. उंटवाले यांनी स्पर्धेबाबत माहिती दिली. स्पर्धेतर्गत प्रकल्प प्रदर्शन, रोबोरेस, अॅक्वा रोबो, लॅन गेमिंग व अन्य स्वरूपात उपक्रम झाले. देशभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन हजारावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पुरस्कार वितरण परसेप्ट वेब सोल्यूशन कंपनीचे संचालक भावीन पारिख यांच्या हस्ते झाले. विजेता व उपविजेत्यांना १ लाख रुपयाचे पुरस्कार वितरित करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. जयवंत काटे, आयोजक प्रा. स्मिता नागतोडे व प्रा. स्वप्नील जैन, तसेच ई-स्पार्कचे विश्वास हजारे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. गायत्री चोप्रा व प्रा. सुयोग डाहुले यांनी सूत्र सांभाळले.