वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी कोंडी फोडत नऊ जणांचा गट स्थापन करीत नगराध्यक्षपदावर दावा केला आहे. तर दोडामार्गमध्ये शिवसेना व भाजपने नगराध्यक्षपदासाठी दावा केला होता.

दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेना व भाजपचे प्रत्येकी पाचप्रमाणे दहा नगरसेवक विजयी झाले आहेत तर काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून सहा व मनसेचा एक नगरसेवक विजयी झाला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाचे दावेदार शिवसेना व भाजप आहेत.
शिवसेना आणि भाजपने नगराध्यक्षपदासाठी दावा केला आहे. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची शिष्टाई महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी सहा जागी विजयी झाले असून, मनसे गळाला लागला तर दोन नगरसेवकांची गरज भासणार आहे.
वैभववाडीत काँग्रेस पक्ष सहा जगांवर विजयी झाला होता. तेथे एक अपक्ष काँग्रेससोबतच होता. त्यामुळे सात संख्या झाली. त्यात ग्रामविकास आघाडीचे स्वप्निल इस्वलकर व रवींद्र रावराणे या दोघांना बरोबर घेऊन नऊ जणांचा स्वतंत्र गट स्थापन केला. जिल्हाधिकारी कार्यालयात तशी रीतसर नोंदही केली.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत ग्रामविकास आघाडीच्या तीन नगरसेवकांच्या हाती सत्तेची चावी होती. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी दोघांना घेऊन नऊ जणांचा स्वतंत्र गट निर्माण केल्याने वैभववाडी नगरपंचायत काँग्रेसकडे खेचली गेली आहे. दोडामार्ग येथे युतीची तर वैभववाडी येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल.