News Flash

वैतरणा पूल वाहतुकीस धोकादायक

आगामी काळात मोठा अपघात होऊन शेकडो प्रवाशांचे प्राण गमवावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वैतरणा पुलालगत बेकायदा वाळू उत्खनन होत आहे.

|| नीरज राऊत- निखिल मेस्त्री

रेल्वे अधिकाऱ्यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

पालघर : वैतरणा पुलाच्या आधारस्तंभाखालील मातीचा थर वाहून गेला असून निर्माण झालेल्या खोलीमुळे वैतरणा पूल क्रमांक ९२ धोकादायक झाल्याचे रेल्वेच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविले आहे. याबाबत ठोस पावले उचलली न गेल्यास आगामी काळात मोठा अपघात होऊन शेकडो प्रवाशांचे प्राण गमवावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने पालघर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

वैतरणा पुलालगत मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन होत असल्याने पुलालगतच्या भागात व विशेषत: पुलाचे आधारस्तंभ असलेल्या भागात अनपेक्षित खोली निर्माण झाली आहे. २०१५-१६ पासून या नदीवरील पूल क्रमांक ९२ व ९३ पासून ६०० मीटर परिसरात रेती-वाळू उत्खनन करण्यास बंदी आणणारे अध्यादेश जिल्हा प्रशासनाने काढले असून त्याचे नूतनीकरण नियमितपणे केले जात आहे. त्याचबरोबरीने या दोन्ही पुलांच्या खालून नौकानयन मार्ग बंद केल्याने रेती उत्खननावर आळा बसला आहे, असा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. त्याचबरोबरीने पूल क्रमांक ९२च्या लगत पोलीस चौकीची उभारणी करण्यात येऊन पुलालगत अहोरात्र पोलीस पहारा करण्यात येत आहे.

अशा परिस्थितीत वैतरणा पूल क्रमांक ९२च्या १६, १७  व १८च्या आधारस्तंभाच्या खालील जमिनीची खोली १२ मीटरने वाढल्याचे रेल्वेच्या विभागीय अभियंता यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. दोन्ही पुलांच्या दुतर्फा बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याचे त्यांनी जिल्हा आपत्ती समूहाच्या ‘ग्रुप वॉर मेसेज’द्वारे नमूद करून त्यामुळे हा पूल धोकादायक स्थितीत आल्याचे जिल्हा आपत्ती विभागाला कळवले आहे. याबाबत तातडीने ठोस उपाययोजना हाती न घेतली गेल्यास मोठी दुर्घटना होऊन हजारो प्रवाशांना प्राणाला मुकावे लागेल, असे त्यांनी सूचित केले आहे. वैतरणा पुलाच्या दुतर्फा दोन किलोमीटर परिसरात वाळू उत्खनन बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

वैतरणा पुलापासून ६०० मीटरवर वाळू उत्खनन बंदी असताना अनेकदा त्या ठिकाणी बेकायदा उत्खनन होत असल्याच्या घटना रेल्वे गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांनी बघितले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर वसईच्या उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन एकंदर परिस्थितीची पाहणी केली. पालघर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पालघरचे उपविभागीय अधिकारी यांना अर्धशासकीय पत्र लिहून त्या ठिकाणी असलेले जमावबंदी तसेच रेती उत्खननाबद्दल असलेल्या निर्बंध नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पत्र जारी केले आहे.

याबाबत रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले. रेल्वे प्रशासनाने या पुलावर इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे काही वर्षांपूर्वी संयुक्त बैठकीमध्ये ठरले होते, मात्र ते आजवर बसवले न गेल्याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता उत्तर प्राप्त झाले नाही. रेल्वेच्या एका विभागीय अभियंत्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समूहाच्या ग्रुपवर पूल धोकादायक झाल्याची माहिती टाकली असली तरी रेल्वेने अधिकृतपणे ही माहिती जिल्हा प्रशासनाला कळवली आहे का, याबाबत दुजोरा मिळू शकला नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:04 am

Web Title: vaitarna bridge dangerous to traffic akp 94
Next Stories
1 सर्पदंश झालेल्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू
2 वधारलेल्या दराने मासळी ‘बेचव’
3 ‘रेमडेसिविर’ची जिल्ह्यात कमतरता
Just Now!
X