जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील वैतरणा व पिंजाळ या दोन्ही नद्या इशारा पातळीजवळ आलेल्या आहेत. पावसाची संततधार कायम राहिल्यास या दोन्ही नद्या धोका पातळी ओलांडून पूर येण्याची शक्यता आहे.

वैतरणा नदीची इशारा पातळी १०१.९० मीटर इतकी असून धोका पातळी १०२.१० मी. आहे. पिंजाळ नदीची इशारा पातळी १०२.७५ मीटर इतकी आहे, तर धोका पातळी १०२.९५ मी. आहे. गुरुवारी वैतरणा नदीने १००.८० मी., तर पिंजाळ नदीने १००. ९५ मीटर पातळी ओलांडली आहे. मासवण येथील सूर्या नदीची इशारा पातळी ११ मी. इतकी असून आताची तिची पाणी पातळी ४.७० मीटर इतकी आहे.

जिल्ह्यातील धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने ही धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बहुतांश धरणे शंभर टक्के भरल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नगर परिषद,नगर पंचायतसह इतर गावांना दिलासा मिळाला आहे.

पालघर जिल्ह्यातील धामणी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा २६७ दलघमी इतका असून गुरुवापर्यंत हे धरण ९७ टक्के भरले आहे, तर कवडास धरणाचा उपयुक्त पाणीसाठा १० दलघमी इतका असून कवडास धरणही शंभर टक्के भरले आहे. यापाठोपाठ वांद्री धरणाचा उपयुक्त जलसाठा ३६ दलघमी इतका असून हे धरणही १००% पूर्णपणे भरलेले आहे. गुरुवारअखेर धामणी धरणातून चार हजार १८४, कवडा धरणातून ७८८४, तर वांद्री धरणातून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे

धरणासह जिल्ह्यात असलेले विविध लघुपाटबंधारे या पावसामुळे भरून वाहू लागले आहेत. जिल्ह्यात पालघर तालुक्यातील मनोर, माहीम केळवा, देवखोप लघु बंधारे १००% भरले असून मनोर बंधारा २६ क्यूसेक्स, देवखोप बंधाऱ्यातून २९ क्यूसेक्स, माहीम-केळवे बंधाऱ्यातून १०४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर डहाणू तालुक्यातील रायतळे बंधाराही पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. या बंधाऱ्यातून दहा क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विक्रमगड तालुक्यातील खांड पाटबंधारा व मोह खुर्द पाटबंधाराही शंभर टक्के भरला असून खांडमधून ४८, तर मोहखुर्दमधून ४५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जव्हार तालुक्यातील डोमहिरा तसेच मोखाडा तालुक्यातील वाघ बंधाराही शंभर टक्के भरला असून दोन्ही मधून ७०९, उत्तर वाघ पाटबंधारेमधून ४६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.