औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. या सभेला एमआयएमच्या नगरसेवकाने विरोध केल्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी बेदम मारले आहे. आज शुक्रवारी दुपारी विशेष सभेत ही घटना घडली आहे.

एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाला विरोध दर्शवला. त्यानंतर संतप्त भाजपा नगरसेवकांनी त्यांना बेदम मारहाण केली. भरसभागृहात अक्षरश: चपलेनं मारलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी कडे करून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली. त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा विरोध केला. त्यानंतर भाजपा नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी तुडवत बेदम मारहाण केली. त्यानंतर सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबन करावे अशी  मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.

वाचा : औरंगाबाद: भाजपा नेत्याची गाडी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी फोडली, चालकाला मारहाण

यासर्व प्रकरणानंतर एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जाताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात चालक विलास काशिनाथ कोराळे गंभीर झाल्याचे वृत्त आहे.

पाहा व्हिडीओ :