कृष्णा-वारणा काठ मान्सूनअभावी अद्याप कोरडाच असताना सांगली जिल्ह्य़ाच्या दुष्काळी पट्टय़ात वळीव पावसाने  दमदार हजेरी लावली. पावसामुळे जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत झाली असून तालुक्यातील सोनलगी, सुसलाद या दोन गावचे टँकर मंगळवारपासून बंद करण्यात आले.
अवघ्या जिल्ह्य़ाला पावसाची गरज असताना हक्काची मृग व आद्र्रा नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या दिसू लागल्याने सामान्यांबरोबरच शेतकरीही धास्तावला आहे. वाळवा, शिराळा, मिरज तालुक्याचा पश्चिम भाग, कृष्णा-वारणेमुळे हिरवागार असला तरी, पाऊसच नसल्याने धास्तावला आहे. असे असताना जत, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग, आटपाडी, विटा आदी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्री जत तालुक्यातील उमदी येथे १०३ मि.मि. पावसाची नोंद झाली. मंगळवारी दुपारीही या परिसरासह जतमध्ये दमदार हजेरी लावली. आटपाडी, दिघंची,विटा परिसरातही वळीव पावसाने दिलासा दिला आहे.
मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आरग,बेडग, सलगरे, जानराववाडी यासह कर्नाटक सीमेवरील म्हैसाळ, नरवाड परिसरात चांगला पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्य़ातील तालुक्याच्या ठिकाणी २४ तासात नोंदला गेलेला पाऊस मिरज-६, तासगाव-२.७, कवठेमहांकाळ १७.५, जत ३१.२, आटपाडी ११.४, पलूस १.५, इस्लामपूर ४.४ आणि शिराळा ६.७  जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करण-या वारणा धरणात आज सकाळी ११.५५ टीएमसी पाणीसाठा होता, तर कोयना धरणात १२.७१, धोम ३.०५, कण्हेर ३.१३, राधानगरी १.९१ आणि दूधगंगा ४.७० टीएमसी पाणी साठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.