प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची स्थापना केली असून त्यांच्या सभांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सभेत होणाऱ्या या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होणार का, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना चिमटा काढला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बहुजन वंचित आघाडीबाबत भाष्य केले आहे. बहुजन वंचित आघाडीचा आरपीआयवर (आठवले गट) परिणाम होणार नाही. माझे मित्र प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून नवीन राजकीय आघाडीची स्थापना केली आहे. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण याचे रुपांतर मतांमध्ये होणार का?, बहुजन वंचित आघाडीला जागा जिंकण्यात यश येणार नाही, असा दावा त्यांनी केला.
आठवले पुढे म्हणाले, २०१४ मध्ये भाजपाने युतीतील छोट्या पक्षांना चार जागा दिल्या. यात आरपीआयला सातारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले आणि माढा येथील जागा आणि राष्ट्रीय समाज पक्षाला बारामतीची जागा दिली होती. आता त्यांनी आमच्या पक्षाला किमान एक जागा द्यावी. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहू शकेल. मी नरेंद्र मोदी किंवा फडणवीस सरकारविरोधात नाही, या दोन्ही सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस- राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सहभागी होणार का, याचेही त्यांनी उत्तर दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भूतकाळात आम्हाला दिलेली अपमानास्पद वागणूक विसरु शकत नाही. २००४ मध्ये शिर्डीत माझा पराभव करण्यासाठी काँग्रेसने षडयंत्र रचले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने नेहमी दलित मतांचा वापर केला, यामुळेच मी आघाडीतून बाहेर पडत युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 18, 2019 12:06 pm