जिल्ह्य़ातील प्रभाववाढीसाठी अमित देशमुख सरसावले

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
BSP, Nagpur, Ramtek, BSP Nagpur,
नागपूर, रामटेकमध्ये बसपाच्या मतांना ओहोटी, गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत…
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Who is Sushil Rinku
केजरीवालांचा लोकसभेतला एकमेव खासदारही भाजपामध्ये; कोण आहेत सुशील रिंकू?

लातूर : गेल्या विधानसभा निवडणुकीत निलंगा व औसा विधानसभा मतदारसंघातून वंचित विकास आघाडीच्यावतीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. निलंगा मतदारसंघातून  डॉ. अरविंद भातंब्रे आणि औसा मतदारसंघातून सुधीर पोतदार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला तर प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी बळ उभे करणारे अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनीही वंचितपासून फारकत घेतली आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या डॉ. भातांब्रे यांनी तिसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते घेतली होती. वंचित विकास आघाडीच्या शक्तीबरोबरच अरविंद भातांब्रे यांचे सामाजिक काम व जातीय समीकरणाचा लाभही त्यांना झाला होता. या दोन्ही नेत्यांची प्रवेश घडवून आणण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.  विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे अभय साळुंके यांना काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश दिल्यानंतर मतदारसंघातील दुसऱ्या सक्षम कार्यकर्त्यांस काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन निलंग्याकडे  विशेष लक्ष असल्याचे संकेत मंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

पालकमंत्री देशमुख हे काँग्रेस ही केवळ लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघापुरती मर्यादित नसून जिल्हाभर काँग्रेस संघटनात्मकदृष्टय़ा ताकदवान आहे हे ठसवण्यासाठी त्यांनी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने केला जात आहे.  जिल्हा काँग्रेसची अध्यक्षपदाची माळ मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जि. प. माजी उपाध्यक्ष, औशाचे श्रीशैल्य उटगे यांच्या गळ्यात घातली. औसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील यांना पराभव पत्करावा लागल्यानंतर औशात काँग्रेसची स्थिती अशक्त झाली होती. पुन्हा काँग्रेसला बळकटी आणण्यासाठी श्रीशैल्य उटगेंना बळ देण्यात आले आहे.  उटगे यांनी आपली निवड योग्य ठरवण्यासाठी औसा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. कासारशिरसी, कासार बालकुंदा या परिसरातील निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या भागाची उपेक्षा होत असल्याची खंत जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर उटगे यांनी त्या भागाचा दौरा केला.  या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांची नाराजी दूर केली.  औसा मतदारसंघात  वंचित विकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले सुधीर पोतदार यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. औशाचे नगराध्यक्ष अफसर शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. औसा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. आगामी नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षाने औशात व्यूहरचना सुरू केली असून औशाची नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात यावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपण औशाला लागणारे आवश्यक ते बळ देऊ व पुन्हा औशाची काँग्रेस मजबूत करू. औसा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहील. औसा नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल, असे म्हटले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष अफसर शेख हे उघडपणे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या विरोधी भूमिका घेत असल्याने काँग्रेसची मंडळी त्यांच्यावर नाराज आहे.  अफसर शेख यांच्या विरोधाच्या भूमिकेला उत्तर म्हणून औसा बाजार समितीवर शिवसेना व काँग्रेस या पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रशासकीय मंडळात स्थान दिले व राष्ट्रवादीला ठेंगा दाखवला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेसची औसा व निलंगा तालुक्यातील बांधणी अमित देशमुख यांच्या पुढाकाराची असल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.