आठ टक्के मते न मिळाल्याने कायम निवडणूक चिन्ह मिळवण्याचे स्वप्न भंगले

राजेश्वर ठाकरे, नागपूर

pune aimim, mim lok sabha candidate anis sundke pune
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत मुस्लिम, दलित समाजासाठी काय केले?”, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंचा पलटवार
s damodaran padmashree Poll Campaign
पद्मश्रीप्राप्त उमेदवाराला निवडणुकीच्या प्रचारात विकावी लागली भाजी, नेमकं काय घडलं?
Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Election Vote Split BJP
भाजपला वंचितचा उमाळा नक्की कशामुळे?

अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ मिळून स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. मात्र, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या मतांपासून दूर राहिल्याने आघाडीला निवडणुकीसाठी कायम चिन्ह आणि इतर निवडणूकविषयक सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये जारी केलेल्या नियमानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा मिळण्यासाठी एकूण वैध मतांच्या किमान आठ टक्के मते त्या पक्षाला मिळणे गरजेचे आहे. बहुजन वंचित आघाडीने आठ महिन्यांत चांगली कामगिरी केली. आघाडीने लोकसभा निवडणुकीत १८ उमेदवारांनी एक लाखांहून अधिक मते घेतली. काही ठिकाणी ही मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार पराभूत करण्यासाठी कारणीभूत ठरली. वंचित आघाडीच्या उमेदवारांना जवळपास ४१ लाखांच्या आसपास मते मिळाली. परंतु, नियमानुसार आवश्यक आठ टक्के मते मिळालेली नाहीत. आघाडीला मिळालेल्या एकूण वैध मतांची टक्केवारी ७.२ आहे. त्यामुळे पक्षाला मान्यता मिळणे कठीण आहे.

आंबेडकर यांच्या आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी  १८ जागांवर सुमारे एक लाखांहून अधिक मते घेतली. परंतु, ही कामगिरी त्यांना मान्यताप्राप्त पक्ष म्हणून दर्जा मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही. वंचित आघाडीला सांगली मतदारसंघात सर्वाधिक ३,००२३४ मते मिळाली. अकोल्यात दोन लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली.त्यापाठोपाठ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एक लाख ७२ हजार, ६२७ (१५.४१ टक्के), सोलापूर येथे एक लाख ७० हजार सात (१५.६८ टक्के), चिमूरमध्ये एक लाख ११ हजार ४६८ (९.७५ टक्के) आणि चंद्रपूर एक लाख १२ हजार ७९ (९.०५ टक्के) मते मिळाली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मतविभाजनाचा फटका बसला आहे. नांदेडमध्ये वंचित आघाडीला एक लाख ६६ हजार १९६ (१४.७२ टक्के) ते मिळाली आहेत.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या पराभवास बहुजन वंचित आघाडी कारणीभूत ठरली. हातकणंगले येथे वंचित आघाडीला एक लाख २३ हजार ४१९ (९.८६ टक्के) मते मिळाली. औरंगाबाद येथून इम्तियाज जलील हे विजयी झाले आहेत. ते एमआयएमच्या तिकिटावर लढले होते.

मते अपुरी

मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोग मान्यता देत असते. त्यासाठी किमान ८ टक्के मते आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीला मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा मिळू शकणार नाही. तरीही या आघाडीतील काही नेत्यांनी मान्यताप्राप्त होणार असल्याची चर्चा सुरू केली आहे. वंचित आघाडीने पाठिंबा दिलेले एमआयएमचे इम्तियाज जलील हे औरंगाबाद मतदारसंघातून निवडून आले असले तरी त्यांनी एमआयएम म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची मते ही वंचित आघाडीची म्हणून गणली गेलेली नाहीत.

औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे एमआयएमचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले. ती मते बहुजन वंचित आघाडीच्या खात्यात मोजली जाणार नाहीत. त्यामुळे मान्यताप्राप्त पक्षासाठी आवश्यक आठ टक्के मते आघाडीकडे नाहीत. वंचित आघाडी पुढील निवडणूक नोंदणीकृत पक्ष म्हणून लढेल.

– राजेंद्र पोटोडे, प्रवक्ता, बहुजन वंचित आघाडी.