सभागृहाचा मान, सन्मान आणि पावित्र्य राखणं गरजेचं असून कोणत्याही धर्माच्या घोषणा देणं चुकीचं आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. लोकसभेत नवविर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडत असताना जय श्रीराम आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी शपथविधीसाठी जात असताना सत्ताधारी खासदारांना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. ज्याला उत्तर देताना ओवेसी यांनी अल्लाहू अकबर म्हणलं होतं.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, ‘अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये. सभागृहात कोणत्याही धर्माच्या घोषणा होता कामा नयेत. सभागृहाचा मान, सन्मान आणि पावित्र्य राखलं पाहिजे’.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मॉब लिंचिंगवरही आपलं मत व्यक्त केलं. हे सरकार जमावाकडून होणारी हिंसा रोखण्यात असमर्थ असल्याची टीका त्यांनी केली. सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिले असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी मॉब लिंचिंगच्या घटना खास मुस्लिमांच्या विरोधात होत असल्याचं सांगितलं. सरकार जर हिंसाचाला समर्थन देणारं असेल तर हिंसाचार होणारच असंही ते यावेळी म्हणाले.