पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांकडून मोदींचा दारुडे असा उल्लेख करण्यात आला. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील सांगवी बुद्रूक येथे पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा उल्लेख केला. नरेंद्र मोदी सगळं काही विकायला निघाले आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली.

ते म्हणाले की, “हिंदीत ‘कवाडी’ म्हणतो ना तसे पंतप्रधान आहेत. दारुड्या कसा दारुला पैसा मिळाले नाही म्हणून बायकोला मारतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही तेव्हा तो घरातील सामान वैगेरे विकतो आणि ते संपलं की तो आपलं घरच विकतो…मोदी या देशाचे पंतप्रधान नसून दारुडे आहेत. म्हणून सगळं विकायला निघालेत अशी परिस्थिती आहे”.

“पंतप्रधान रेल्वे, एअरपोर्ट विकायला निघाले आहेत. एअरपोर्ट नफ्यात आहे तरी विकत आहेत? जेव्हा गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हाच अशा पद्धतीने विकायला काढलं जातं,” अशी टीका त्यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार हे तीन पायाचं आहे. ज्याच्याकडे सहकार खातं आहे ते तिसऱ्या पायाला शेतकऱ्यांना मदत करू देण्यात अडथळे निर्माण करत आहे अशी टीका करताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, लवकरात लवकर सरकारने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.