News Flash

मृतदेहाची अदलाबदल झाल्याने रुग्णालयामध्ये तोडफोड

यवतमाळातील शहा हॉस्पिटलमधील महिनाभरातील दुसरी घटना

प्रतिनिधिक छायाचित्र

यवतमाळातील शहा हॉस्पिटलमधील महिनाभरातील दुसरी घटना

यवतमाळ : येथील वादग्रस्त ठरलेल्या शहा हॉस्पिटल या खासगी कोविड दवाखान्यात मृतदेहाची अदलाबदल झाल्याने मृत रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली. रविवारी सकाळी ११ वाजता घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यवतमाळ येथील अ‍ॅड. अरुण गजभिये येथील शहा हॉस्पिटलमध्ये भरती होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता.

नातेवाईकांनी सकाळी दवाखान्यातून अ‍ॅड. गजभिये यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात पोहोचले. तेथे त्यांनी रॅपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह उघडून बघितला असता तो अ‍ॅड. गजभिये यांचा नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. त्यामुळे संतप्त नातेवाईक मृतदेह घेऊन थेट शहा यांच्या दवाखान्यात पोहोचले. तेथे त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनास जाब विचारला. मात्र डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड सुरू केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

अ‍ॅड. गजभिये यांच्या मृतदेहाऐवजी त्यांच्या नातेवाईकांना आर्णी येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार दिगांबर शेळके यांचा मृतदेह देण्यात आला. शेळके यांचाही मृत्यू शनिवारी रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या नातेवाईकांकडून देयकाची रक्कम जमा न केल्याने शेळके यांचा मृतदेह व्यवस्थापनाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी यावेळी केला. शेळके यांचे कुटुंबीय मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात प्रतीक्षेत असताना त्यांचा मृतदेह गजभिये यांच्या नातेवाईकांना देऊन रुग्णालयाने दोन्ही कुटुंबीयांची फसवणूक करून मृतांची विटंबना केल्याचा आरोप यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी केला.

या घटनेनंतर अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत नातेवाईकांनी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली होती. या घटनेनंतर रुग्णालय व्यवस्थापनाने सावरासावर करून अ‍ॅड. गजभिये यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना आपण सुपूर्द केलाच नव्हता, ते परस्परच मृतदेह घेऊन गेल्याने हा गोंधळ झाल्याचा दावा केला आहे. यावरही गजभिये व शेळके या दोन्ही कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. रुग्णालयाने अ‍ॅड. गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल तर तो त्यांनी कसा नेला, कोणतेही सोपस्कार न करता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तो कसा नेऊ दिला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गजभिये व शेळके या दोन्ही कुटुंबीयांनी सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतले. एकमेकांच्या तक्रारीवरून तोडफोड करणाऱ्यांसह डॉ. शहा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.

गोंधळ सुरू असताना दवाखान्यात एका सिलिंडरमधील प्राणवायू संपल्याने आणखी गोंधळ वाढला. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी गोळा होऊन प्राणवायूची व्यवस्था करण्याची मागणी केली. पोलिसांनाही याबाबत सांगितले. अखेर पोलिसांनी धावपळ केली. त्यानंतर काही वेळाने सिलिंडर घेऊन वाहन दाखल झाले. तेव्हा कर्मचाऱ्यांना हाताशी घेत प्राणवायू संपलेले सिलिंडर बदलवल्याने संभाव्य अनर्थ टळला. शहा हॉस्पिटलमध्ये तोडफोड होण्याची महिना भरातील ही दुसरी घटना आहे. या दवाखान्यात रुग्णांची प्रचंड आर्थिक लूट होऊनही प्रशासनाच्या वरदहस्तामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनाची मुजोरी वाढल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:56 am

Web Title: vandalism at the hospital due to the exchange of bodies zws 70
Next Stories
1 चंद्रपुरात करोना बळीच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विलंब
2 Coronavirus : रायगडमध्ये दिवसभरात ९०८ करोनाबाधित
3 महाराष्ट्रातून बंगालमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करोना चाचणी सक्तीची
Just Now!
X