अ‍ॅमेझॉन विरोधात मनसे आक्रमक झाली असून वसईतील अ‍ॅमेझॉन ऑफिस आज सायंकाळी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान मिळावे अशी मागणी मनसेने अ‍ॅमेझॉनकडे केली होती विनंती करूनही अ‍ॅमेझॉनने काहीही दखल न घेतल्याने मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.  दरम्यान हा वाद आता न्यायालयात पोहचला आहे. याप्रकरणी राज ठाकरेंना बजावलेली नोटीस चुकीची आहे असं सांगत मनसे कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचा निषेध करत वसई मधील अ‍ॅमेझॉनचे ऑफिस फोडलेे आहे. दरम्यान पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांमध्येही तोडफोड करण्यात आली आहेत.

काय आहे नेमका वाद 
अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं. मात्र आता हे सगळं प्रकरण कोर्टात गेल्याने मनसे आक्रमक झाली आहे.