हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्या आठवडय़ात विधिमंडळात गोंधळ, घोषणाबाजी व्यतिरिक्त काहीच घडले नसले तरी विधिमंडळाबाहेर वन्यजीवांवरून सत्ताधाऱ्यांच्या तीन तऱ्हा चांगल्याच चर्चिल्या गेल्या. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी पत्नी व कन्येसह कुठलाही सरकारी बडेजाव न करता शांतपणे केलेले व्याघ्रदर्शन त्यांच्या शिस्तबद्धतेचा परिचय घडवणारी ठरले. शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेतील सफारीदरम्यान रक्ताळलेल्या वन्यजीवांच्या मृतदेहांवर पाय ठेवून काढलेल्या छायाचित्रांचा वाद ताजाच असताना मुख्यमंत्र्यांची शिस्त अन्य मंत्र्यांना धडा घालून देणारी ठरली. याचदरम्यान वनमंत्री पतंगराव कदम यांनी त्यांचे पुत्र विश्वजित कदम यांच्या विवाह सोहळ्यात कृष्णमृग शिकार प्रकरणातील आरोपी  व अभिनेता सलमान खान याने काही दिवसांपूर्वी लावलेली हजेरीदेखील नेमकी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
मुख्यमंत्र्यांना ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रविवारी वाघिणीचे तीन बछडय़ांसह दर्शन झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब व्याघ्रदर्शनाची ओढ पूर्ण झाली. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ताडोबाला भेट दिली होती परंतु, त्यांच्या नशिबी व्याघ्रदर्शन नव्हते. वन खात्याच्या नियमांचे पालन करीत मुख्यमंत्र्यांनी खुल्या जिप्सीमध्ये बसून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश केला. राजशिष्टाचार असतानाही त्यांच्यासोबत फक्त वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी होते. अन्य ताफा मोहुर्लीच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आला होता. वन खात्याच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने ही खबरदारी घेण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची शिस्तबद्ध ताडोबा भेटी सुरू असताना वनमंत्री पतंगराव कदम मात्र यवतमाळात सलमानने त्यांच्या घरच्या समारंभात लावलेल्या हजेरीचे स्पष्टीकरण देण्यात गुंतले होते. याचदरम्यान फौजिया खान यांच्या शिकार व फोटो सेशन प्रकरणात काहीच माहीत नसल्याची काणाडोळा करणारी भूमिका वनमंत्र्यांनी घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रत्यक्षात काय घडले हे जर मला काहीच माहिती नाही तर त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे म्हणून पतंगरावांनी अडचणीच्या प्रश्नांना पद्धतशीरपणे बगल दिली.
दुर्मीळ कृष्णमृगाची शिकार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू असलेला चित्रपट अभिनेता सलमान खान याला विश्वजितच्या लग्नाचे निमंत्रण दिले नव्हते वा त्याला विशेष मेजवानीतही बोलवले नव्हते, पण तो स्वत:हून रात्री १० वाजता भोजन समारंभाला आला होता, असे स्पष्टीकरण पतंगरावांनी दिले. विश्वजितच्या लग्न सोहळ्यात सलमान खान हजर राहतो, त्याचे स्वागत होते, त्याला कापर्यंत सोडण्यासाठी विश्वजित स्वत: जातो, एका आरोपीचा एवढा सन्मान कशासाठी? असा प्रश्न विचारला असता पतंगराव म्हणाले, घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्याला धिक्कारण्याची आपली संस्कृती नाही. कापर्यंत सोडणे हा माणुसकीचा भाग आहे, त्या घटनेचे एवढे भांडवल करणे बरोबर नाही.