डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांचा खून ही ‘राजकीय हत्या’ असल्याचा आरोप करीत विविध राजकीय पक्ष, संस्था व संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नगरमध्ये आज, रविवारी निषेध मोर्चा काढला. मोर्चाच्या मार्गावरील दुकाने काही काळ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला. यावेळी केंद्र व राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला. आरोपींचा लवकर शोध न घेतल्यास डाव्या संघटना कायदा हातात घेतील, असाही इशारा देण्यात आला.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्ष, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटना, जमाते इस्लाम, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिक्षक व शिक्षकेतर संघटना आदींचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक घेतले होते व घोषणाही दिल्या.
बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघालेला मोर्चा माळीवाडा-पंचपीर चावडी-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट-चितळे रस्ता-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट मार्गे हुतात्मा स्मारकात समारोप झाला. मोर्चाच्या मार्गावर चौकसभा घेऊन निषेध करण्यात आला.
कॉ. मेहबूब सय्यद, श्याम असावा, कारभारी गवळी, शिवाजी कराळे, कॉ. नानासाहेब कदम, शाकिर शेख, उबेद शेख, बहिरनाथ वाकळे, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, अनिस अहमद, असिफखान दुलेखान, बाळासाहेब पवार, सुभाष कडलग, कॉ. अनंत लोखंडे, आनंद वायकर, प्रियदर्शन बंडेलू, किरण उपकारे, सतीश सातपुते, जालिंदर बोरुडे, प्रमोद मोहळे आदींनी पानसरे यांच्या हत्येचा निषेध केला.