खरिपाच्या पेरणीसाठी अत्यावश्यक असणा-या मृग-आर्द्रा नक्षत्राने सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात बऱ्यापकी हजेरी लावली असली तरी जत,आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्याला  मात्र दगा दिला आहे. जत, आटपाडी तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अवघ्या ३ ते ५ टक्के क्षेत्रावरच झाल्या आहेत. बहुतांश गावात पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप टँकरचीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
पावसाळ्यातील दोन नक्षत्रे संपत आली आहेत. मृग नक्षत्राच्या पावसाने बऱ्यापकी सुरुवात केली होती. जिल्ह्याच्या पश्चिम भागात म्हणजेच शिराळा, इस्लामपूर, पलूस, कडेगाव तालुक्याचा काही भाग, तर मिरज तालुक्यातील पश्चिम भाग या ठिकाणी मृग नक्षत्राच्या पावसावर खरिपाच्या पेरण्याही आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सरासरी पश्चिम भागात ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून या ठिकाणी पिके कोळपणीच्या स्थितीत आली आहेत.
जत तालुक्यात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात ३० ते ४० मि.मि. पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गेल्या तीन आठवडय़ांपासून पावसाने दडी मारली आहे. पेरणीसाठी बी-बियाणांची तजवीज करुन शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत होते. तालुक्यातील बाज, बेळुंखी, कोंत्येव बोबलाद, या परिसरात ५ ते ७ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचलेल्या कोसारी, बिर्ला, कंठी, बागेवाडी, हिवरे,डोर्ली, प्रतापपूर, गुळवंची आदी परिसरात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बरी आहे. मात्र तालुक्याच्या अन्य भागात पाण्यासाठी चाललेली ओढाताण कायम आहे. अद्याप ७४ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात असून २४ ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत.
आटपाडी तालुक्यातही गंभीर स्थिती असून पावसाच्या ९ पकी २ नक्षत्रांनी दगा दिल्याने यंदाही खरिपाचा पेरा अशक्य ठरण्याची भीती आहे. तालुक्यातील नेलकरंजी, खरसुंडी, करगणी, शेटफळे परिसरात तुरळक सरीवर माळराने हिरवी झाली असली तरी, जनावरांच्या तोंडाला येईल इतपत चारा उपलब्ध नाही. तालुक्यात अद्याप ५६ पकी ३० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. कवठेमहांकाळ तालुक्याच्या जाखापूर, कुंडलापूर, तिसंगी, घाटनांद्रे आटपाडी तालुक्यातील हिवरे, पळशी, ताडाची वाडी, शुकाचार्य आदी घाटमाथ्यावर पावसाचा पत्ता नाही. या परिसरात रानातील वस्तीवर वास्तव्यास असणाऱ्या लोकांना अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यात ७०४ गावांपकी सुमारे १५५ गावांना व १६३७ वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे.