20 February 2019

News Flash

देशाबाहेर विस्तारलेले उद्योग क्षितिज

‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.’ या उद्योगाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक.

|| अनिकेत साठे

केवळ ५०० किलो क्षमतेने सुरू झालेल्या ‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.’ ची फळांवरील प्रक्रियेची क्षमता आज दररोज ५०० मेट्रिक टन आहे.  केचअप बनविणाऱ्या ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ला वर्षांकाठी लागणारी टोमॅटो पेस्टची पूर्तता ‘वरुण अ‍ॅग्रो’ एकटाच करतो. या उद्योगाच्या निर्यातक्षम कृषीमालासाठी राज्यातील साडेसहा हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती करण्याची कल्पकता दाखवली गेली असल्याने या शेतकऱ्यांना शाश्वत भाव, बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आजच्या दुर्गा आहेत, ८५ हून अधिक देशांत पोहोचलेल्या आणि वार्षिक ५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असणाऱ्या ‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.’ या उद्योगाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक.

कृषी प्रक्रिया उद्योगात कसे काम चालते, कोणती यंत्रसामग्री वापरतात, हे प्रत्यक्ष दाखविण्यास स्थानिक उद्योगाने नकार दिला. पण, त्यांनी हिंमत सोडली नाही. स्वत:चा उद्योग उभारणीचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता धडपड सुरूच ठेवली. कृषीमालावर प्रक्रियेच्या पद्धती, बाजारपेठ, यंत्रसामग्रीचा सखोल अभ्यास केला. कर्ज मिळावे म्हणून पाच र्वष बँकांचे अक्षरश: उंबरठे झिजवले. अखेर प्रकल्पाची पायाभरणी झाली. अल्पावधीत देशाच्या बाजारपेठेत भक्कमपणे पाय रोवले. नंतर आपली उत्पादने गुणवत्तेच्या बळावर थेट जगाच्या बाजारात पोहोचविण्यापर्यंत पेललेली आव्हाने आज त्यांच्या उद्योगाला ८५ हून अधिक देशांत घेऊन गेली आहेत. ‘वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.’च्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा धात्रक यांचे यश चकित करणारे आहे.

नाशिकपासून २५ किलोमीटर

वरील उमराळे येथील टेकडीवजा १७  एकर जागेत मनीषा धात्रक यांचा ‘वरुण अ‍ॅग्रो प्रकल्प’ आहे. देशात टोमॅटोची सर्वाधिक पेस्ट तयार करणारा प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. या ठिकाणी आंबा, पेरू, पपई, केळी, लिंबू आदी फळांवरही प्रक्रिया केली जाते. केवळ ५०० किलो क्षमतेने सुरू झालेल्या या प्रकल्पाची आज दररोज ५०० मेट्रिक टन फळांवर प्रक्रियेची क्षमता आहे. लवकरच ती दुपटीहून अधिक होण्याच्या मार्गावर आहे. वर्षभरात तब्बल एक लाख मेट्रिक टन फळांवर प्रक्रिया केली जाते. निर्यातक्षम कृषीमालासाठी मनीषा यांनी राज्यातील साडेसहा हजार शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती करण्याची कल्पकता दाखवली. विशेष वाणांच्या लागवडीने एकरी उत्पादन वाढवून त्यांच्याही नफ्यात भर घातली. या प्रकल्पाने लक्षणीय भरारी घेतली असली तरी त्यामागे दीड-दोन दशकांचा खडतर प्रवास आहे.

मनीषा या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील. त्यांचे वडील हवालदार होते. मनमाडस्थित मराठी माध्यम शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी मिळवली. उद्योग-व्यवसाय हेच स्वप्न होते त्यासाठी दिंडोरीतील उमराळे येथील शशिकांत धात्रक या स्वप्नपूर्तीला पाठबळ देणाऱ्या साथीदाराची निवड केली.

अत्यल्प दरामुळे शेताच्या बांधावर फेकले जाणारे टोमॅटो त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची प्रेरणा ठरले. विचारचक्र सुरू झाले. पण, भांडवलाचा प्रश्न होता.  सासरच्या शेतकरी मंडळींची आर्थिक स्थिती सर्वसाधारण होती, थोडीफार शेती वगळता हाती काही नव्हते. कर्ज मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तसाच त्रास प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक ५० परवाने मिळवताना सहन करावा लागला. बऱ्याच प्रयत्नान्ती एका सहकारी बँकेने कर्ज दिले. त्यातून टोमॅटोची पेस्ट बनविण्याऱ्या छोटेखानी उद्योगाची सुरुवात झाली. कालांतराने या क्षेत्रातील संधी लक्षात आल्यानंतर मनीषा यांनी फळांवर प्रक्रियेची क्षमता प्रतिदिन ५०० मेट्रिक टनावर नेण्याचे ठरवले. परदेशात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त केली. या प्रकल्पासाठी २० कोटी रुपये भांडवलाची निकड होती. मात्र, कर्ज देण्यास कोणी तयार नव्हते. चार ते पाच र्वष त्या विविध बँकांमध्ये खेटा मारत होत्या. अथक प्रयत्नान्ती ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने पतपुरवठय़ाची तयारी दर्शवली. प्रकल्प अहवाल सादर केल्यावर कर्ज मिळण्यास दोन र्वष लागले. अत्याधुनिक यंत्रसामग्री परदेशातून मागवण्यात आली. उमराळे गावात आठ वर्षांपूर्वी ‘वरुण अ‍ॅग्रो’चा विस्तार झाला.

ग्रामीण भागात प्रचंड क्षमतेचा प्रक्रिया उद्योग उभारताना त्यांनी जगाची बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवली होती. आधुनिक तंत्राने कृषी उत्पादकता वाढवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि नवनवीन बाजारपेठ शोधणे हे त्यांच्या कामाची वैशिष्टय़े. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्रतवारीचा भाग वगळता अन्यत्र कुठेही मानवी स्पर्श होत नाही. टोमॅटो पेस्टच्या जोडीला आंबा, पेरू, पपई, केळी, लिंबू यांचा गर काढण्याचे कामही या ठिकाणी केले जाते. केचअप बनविणाऱ्या ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ला वर्षांकाठी जेवढी टोमॅटो पेस्ट लागते, त्याची पूर्तता ‘वरुण अ‍ॅग्रो’ एकटाच करतो. उद्योग विस्तारानंतर मनीषा यांनी यशोशिखरे पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. सात र्वष मुदतीच्या २० कोटींच्या कर्जाची परतफेड त्यांनी सहा वर्षांत केली. कृषी व्यवसायाला चालना देणाऱ्या उद्योगासाठी थोडेथोडके नव्हे, तर १६ टक्के दराने व्याज भरले. आज त्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांहून अधिक आहे. १२० हून अधिक जणांना त्यांनी रोजगार दिला. करार पद्धतीच्या शेतीने हजारो शेतकऱ्यांना शाश्वत भाव, बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बाजाराची गरज लक्षात घेऊन मनीषा यांनी प्रकल्पात नव्याने ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता या प्रकल्पाची क्षमता ११०० मेट्रिक टन होईल. फळांचा रस, टोमॅटो सॉसचा स्वत:चा ‘ब्रँड’ त्या बाजारात आणत आहेत. ग्राहकांना दर्जेदार भाजीपाला, फळांचे काप देण्याकरिता खास वातानुकूलित प्रक्रियेचे तंत्रज्ञान आत्मसात केले. प्रतवारी, स्वच्छता करून मका, कोबी, फ्लॉवर, भेंडी, पालक, कांदा पात आदी क्षणार्धात वातानुकूलित (ऑनलाइन इन्स्टंट फ्रोजन) प्रक्रिया होऊन डब्यात बंदिस्त केले जातात. ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थाचा विचार सुरू आहे. आता पाठी वळून बघणे नाही, हाच त्यांचा मंत्र आहे.

उद्योग उभारणीआधी एका उद्योगाने आपली यंत्रसामग्री दाखविण्यास नकार दिला होता. तो अनुभव पुन्हा कोणाच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून मनीषा यांनी ‘वरुण अ‍ॅग्रो’चे दरवाजे नवउद्यमी, शेतकरी, अभ्यासकांना सदैव खुले ठेवून मनाचा मोठेपणा दाखवला आहे आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

संपर्कासाठी पत्ता –

  • वरुण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग फूड्स प्रा. लि.
  • गट क्रमांक १८१, उमराळे, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक – ४२२००३.
  • भ्रमणध्वनी – ३५०६१७००७, ७३५०६५७००७

md@varunagro.com

 

First Published on October 12, 2018 1:02 am

Web Title: varun agro processing foods private limited