वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय; काही दुकानांनाच परवानगी

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात नियमावली जाहीर करून वसई-विरार शहरातील दुकाने सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र दोनच दिवसांत हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. खरेदीसाठीची गर्दी आणि करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. केवळ शेतीविषयक दुकाने, चष्म्यांची दुकाने, हार्डवेअर, प्लंबिग, इलेक्ट्रिक दुकाने रविवार वगळून सुरू राहणार आहेत.

करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून लागू केलेल्या टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रशासनाने शिथिलता देण्यास सुरुवात केली होती. वसई-विरार महानगरपालिकेने या संदर्भात आर्थिक घडामोडींना गती येण्यासाठी दुकानांसाठी काही अटी-शर्ती देऊन नियमावली जाहीर केली होती. यासाठी महापालिकेने आठवडय़ातील सात दिवसात आळीपाळीने दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. स्वच्छता, र्निजतुक आणि सामाजिक अंतराचे पालन करत आपले व्यवहार करणे आणि एका रांगेतील केवळ पाच दुकाने सुरू ठेवणे, असे नियम होते. तसेच दुकानांच्या बाहेर नागरिकांना हात धुण्यासाठी द्रव साबणाचा आणि सॅनिटायजरचा ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते.सर्व दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र आता वाढती गर्दी लक्षात घेऊन हा आदेश मागे घेण्यात आला आहे.

गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. केवळ शेती विषयक बी बियाणे, औषधे, खते व शेती अवजारे शेती विषयक उपकरणे, पशू खाद्य, चष्म्यांची दुकाने, हार्डवेअर, प्लंबिग, सिमेंट विक्री, इलेक्ट्रिक दुकाने सुरू राहणार आहेत.

शिथिलता मिळाल्याने रस्त्यावर नागरिकांचा वावर

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता देण्यात आल्याने नागरिकांचा रस्त्यांवरील वावर वाढू लागला आहे. सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात शहरातील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी शासनाने काही प्रमाणात अटी शिथिल करून सामाजिक अंतर राखून आणि योग्य ते नियम पाळून शहरातील विविध दुकाने, उद्योग व्यवसाय व इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा येथील विविध ठिकाणच्या रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.