कोविड-१९ चाचणी करण्याची परवानगी काही खासगी प्रयोगशाळांना मिळाली असली तरी एका प्रयोगशाळेचे अहवाल सदोष आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिकेने थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या चाचण्यांवर बंदी घातली आहे.

वसई-विरार शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोविड- १९ ची चाचणी करण्याचे पालिकेचे केंद्र वसईत नाही. त्यामुळे मुंबईतून चाचणी अहवाल येण्यासाठी विलंब लागत आहे. करोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी व लवकरात लवकर माहिती पुढे यावी यासाठी केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च केंद्र (आयसीएमआर) या संस्थेने राज्यातील काही खासगी प्रयोगशाळांनाही नमुने तपासण्याची परवानगी दिली आहे. त्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचाही

समावेश आहे. करोनाची तपासणी करण्यासाठी वसई-विरार शहरातील बहुतांश करोना संशयित रुग्णांचे नमुने थायरोकेअर केंद्रात तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र तपासणी केंद्रात पाठविण्यात आलेल्यांचे अहवाल सदोष असल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी यांनी थायोरोकेअर प्रयोगशाळेवर चाचण्यांसाठी बंदी घातली असून त्या संदर्भातील परिपत्रकसुद्धा जारी करण्यात आले आहे.

‘बंदीचे आदेश काढायला सहा दिवस का?’

वसईत नेमण्यात आलेल्या थायरोकेअर प्रयोगशाळा केंद्रातील तपासणी अहवाल सदोष स्वरूपात येत असल्याची पालिकेला १२ मे रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत माहिती समोर आली होती, मात्र पालिकेने करोना चाचण्या बंद करण्याचे आदेशपत्र हे १८ मे रोजी काढण्यात आले. मात्र या बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने सहा दिवसांचा अवधी लावला. परंतु या सहा दिवसांत या थायरोकेअर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्या योग्य असतील का, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवायचा का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे मत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केले आहे.

थायरोकेअर प्रयोगशाळेला करोना चाचणी करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे काही अहवाल सदोष आल्याने हा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिलेले अहवाल तपासण्यात येत आहेत.

– रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

थायरोकेअर प्रयोगशाळेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी जे चुकीचे अहवाल दिलेले होते ते खूप आधीचे आहेत. त्यामुळे रुग्णांना आता त्याचा काही त्रास होणार नाही.

– डॉ.तब्बसुम काझी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका